पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाची चर्चा देशभर होत असताना, भाजपने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे, मात्र, धनंजय मुंडे हे कोणतेही टेन्शन न घेता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात मुंडे यांनी आज नेहमीप्रमाणे जनता दरबारास उपस्थित राहून जनतेच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले.
राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्यांच्या वतीने मुंबई पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार घेतला जातो. त्या ठिकाणी राज्यभरातील नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मंत्री काम करतात. गुरुवारी धनंजय मुंडे यांचा जनता दरबार असतो, त्यासाठी ते दोनच्या सुमारास पक्ष कार्यालयात दाखल झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी जनता दरबार घेतला.
मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत सगळा प्रकार मांडला. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला होता.
किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंडे यांनी दुसऱ्या पत्नीसाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हे प्रकरण मंगळवारी समोर आले तेव्हापासून, देशभरात या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. धनंजय मुंडेंचे काय होणार? हा प्रश्न त्यांच्या कार्याकत्यांना आणि राज्यातील नागरिकांना ही पडला आहे. भाजपने या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडे बाबत काय निर्णय घ्याचा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चर्चा करण्यासाठी वरिष्ट नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री प्रफुल पटेल उपस्थित होते.

