शरद पवारांच्या टीकेवरून फडणवीसांची दरेकरांवर स्तुतीसुमने - Devendra Fadnavis praises Pravin Darekar on Sharad Pawars criticism | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या टीकेवरून फडणवीसांची दरेकरांवर स्तुतीसुमने

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

पद हे मिरवण्यासाठी नसते तर ती एक जबाबदारी असते. शरद पवार साहेब जे बोलले त्याबाबत तुम्हाला वाईट वाटले. पण अशा गोष्टीची काळजी करायची नसते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : पद हे मिरवण्यासाठी नसते तर ती एक जबाबदारी असते. शरद पवार साहेब जे बोलले त्याबाबत तुम्हाला वाईट वाटले. पण अशा गोष्टीची काळजी करायची नसते. एकदा एका विरोधीपक्ष नेत्याला पवार साहेब तोडपाणी करणारा विरोधी पक्षनेता म्हणाले होते. पण आज तोच त्यांच्या जवळ आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची पाठराखण केली. 

आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात भेंडी बाजारातील महिला होत्या, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली होती. त्यांनतर ''हे वक्तव्य ऐकून मला लाट वाटत आहे. कारण मीही विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होता,'' अशी टीका शरद पवार यांनी दरेकरांवर केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. 

दरेकर यांच्या 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दरेकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना ते म्हणाले, ''भाषणं तर अनेक जण करतात, पण मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आहेत. प्रवीण दरेकर हे लढणारे नेते आहेत. शरद पवार साहेब जे बोलले त्याबाबत तुम्हाला वाईट वाटले. पण अशा गोष्टीची काळजी करायची नसते. एकदा एका विरोधीपक्ष नेत्याला पवार साहेब तोडपाणी करणारा विरोधी पक्षनेता म्हणाले होते. पण आज तोच त्यांच्या जवळ आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांवर टीका...

मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ''देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात होते. अशा परिस्थितीमध्ये काही लोक वेगवेगळे पॅटर्न सांगून स्वतःची पाठ थोपवत होते. लोकांना नेते हवेत भाषण द्यायला नको. लोकांना दुःखातुन बाहेर काढणारे नेतृत्व हवे असते. असा अहवाल काढायला अधिकार लागतो.'' 

हल्ली घरबसल्या अहवाल काढतात

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईत पर्यायी जागा शोधण्यासाठी समिती नेण्यात आली आहे. मात्र, समितीचा अहवाल आधीच तयार असल्याची टीका फडणवीस यांनी यापुर्वीही केली आहे. त्यावरून आजही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ''असा अहवाल काढायला अधिकार लागतो. हल्ली लोक घरबसल्या अहवाल काढतात आणि स्वतःची पाठ थोपटवून घेतात. काही लोकांनी इगोचा इश्यू केला त्यामुळे पुढचे चार वर्षे मेट्रोत मुंबईकराना बसता येणार नाही,'' असा टोला त्यांनी लगावला.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख