devendra fadavnis writes letter to udhhav thackrey on maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर व्हा; फडणवीसांचे ठाकरेंना पत्र

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 जुलै 2020

आता गेल्या 7 महिन्यांपासून राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्त्वात नाही आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने योग्य सहकार्य नसल्याचीही बाब पुढे आली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत शासकीय अधिकार्‍यांमार्फत योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. असे होता कामा नये, याकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील दि. 27 जुलै 2020 रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण वाचनात आले. या निरीक्षणात पृष्ठ क्रमांक 6 वर राज्य सरकारचे वकील श्री मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकारचे अधिकारी कार्यक्षमपणे या प्रकरणात सहाय्य करण्यात कमी पडत असल्याचे न्यायालयात सांगितल्याचे नमूद आहे. आपण जाणताच की, मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोठी आंदोलने झाली. या आंदोलनानंतर कायद्याच्या चौकटीत टिकेल, असे आरक्षण देण्यासाठी तत्कालिन सरकारने पुढाकार घेतला. राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून ते आरक्षण उच्च न्यायालयाने सुद्धा वैध ठरविले. मात्र आता गेल्या 7 महिन्यांपासून राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्त्वात नाही आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने योग्य सहकार्य नसल्याचीही बाब पुढे आली आहे. या बाबी गंभीर असून, अजूनही वेळ न घालवता गांभीर्याने या प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे. आपण ते द्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

पीएम केअर्सच्या व्हेंटीलेटर्सवरून महापालिकेवर टीका

मुंबई : केंद्र सरकारने पीएम केअर्स योजनेतून मुंबईकरांसाठी पाठवलेले व्हेंटीलेटर महापालिकेतील सत्ताधारी प्रशासन जाणुनबुजून वापरत नसल्याचा आरोप भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी केला आहे. 'करून दाखवलं'चे फलक लावणाऱ्यांनी मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी पीएम केअर्स योजनेतून दोन आठवड्यांपूर्वी दहा व्हेंटीलेटर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवले होते. मात्र ते अद्यापही तेथे धूळ खात पडून आहेत, काही व्हेंटीलेटर तर खोक्यांमधून काढलेही नाहीत, असा दावा खणकर यांनी केला आहे. त्यांची अवस्था दाखविणारी छायाचित्रेही त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. केवळ या व्हेंटीलेटरचे श्रेय केंद्रातील भाजप सरकारला मिळू नये, अशा कोत्या राजकारणामुळे ती वापरली जात नाहीत.  ही व्हेंटीलेटर तशीच ठेऊन द्यायची व नंतर परत पाठवायची, असा प्रशासनाचा डाव यामागे असल्याचा आरोपही खणकर यांनी
केला.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख