उद्धवजी, लढाई कोरोनाविरूद्ध असली पाहिजे, आकडेवारीविरूद्ध नाही! - devendra fadavnis writes letter to chief minister uddhav thakrey on corona issues | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धवजी, लढाई कोरोनाविरूद्ध असली पाहिजे, आकडेवारीविरूद्ध नाही!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जून 2020

एकिकडे ही सर्व परिस्थिती असताना अजूनही मुंबईत कोरोना बळींची संख्या दडविली जात असल्याचे मी सातत्याने आपल्या निदर्शनास आणून दिले आहे.

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस दाहक होत असून, एकूणच आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. कोरोना बळीसंख्येत सुद्धा पारदर्शिता नाही. या सर्व बाबींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखाची होत आहे. दि. 19 जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक 3827 रूग्ण आढळून आले आहेत. याचदिवशी मुंबईतील सर्वाधिक बळींची संख्या 114 इतकी नोंदली गेली आहे. 18 जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तर राज्यातील एकूण कोरोना रूग्णांच्या संख्येत 52.18 टक्के वाटा हा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई आणि एमएमआर क्षेत्राचा विचार केला तर हा वाटा 73.85 टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा 5.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यातील गेल्या 18 दिवसांचा विचार केला तर राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रूग्णांच्या संख्येत 43.86 टक्के रूग्ण या 18 दिवसांत वाढले आहे. मुंबईत 36.88 टक्के रूग्ण या 18 दिवसांत वाढले आहेत. गेले तीन महिने सातत्याने कोरोना बळींची संख्या लपविली जात होती. त्याबाबत आपल्याला सूचित केल्यानंतर एकाच दिवशी राज्यभरातील बळीची संख्या 1328 ने वाढली. ही एक दिवसाची वाढ विचारात घेतली नाही, तरी नवीन बळींच्या संख्येत जूनच्या या 18 दिवसांत महाराष्ट्रात 37.16 टक्क्यांनी वाढ झाली असून, मुंबईत ती वाढ 35.16 टक्के इतकी आहे.

एकिकडे ही सर्व परिस्थिती असताना अजूनही मुंबईत कोरोना बळींची संख्या दडविली जात असल्याचे मी सातत्याने आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. आतातर उदाहरणांसह या बाबी उजेडात येत आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की, याबाबत अतिशय पारदर्शीपणे आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली पाहिजे. आपण म्हणता त्याप्रमाणे हे युद्ध किंवा लढाई कोरोनाविरूद्ध असली पाहिजे, आकडेवारीविरूद्ध नाही. मुंबई महापालिकेतील आकडेवारीबाबत तातडीने लक्ष घालून मुंबईतील स्थितीबाबत स्पष्ट आणि पारदर्शी माहिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. आणखी एका गंभीर विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मुंबईतील केईएम रूग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे 10 रूग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. आधीच कोरोनाचा कहर वाढत असताना त्यात मानवी चुकांमुळे बळीसंख्येत भर पडणार असेल तर तो प्रकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी सुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रूग्णालयात 12 जणांना ऑक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले होते. असे प्रकार वारंवार होत राहणे, हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण स्वत: या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख