फडणवीसांचा रोज सकाळी कुणाशी होतो 'सामना'? ट्विटरवर दिलं रोखठोक उत्तर... - Devendra fadanvis slams shivsena over oxygen shortage issue | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांचा रोज सकाळी कुणाशी होतो 'सामना'? ट्विटरवर दिलं रोखठोक उत्तर...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न वाचता कुणी एवढ्या उधळपणे लिहू किंवा बोलू कसे शकते?, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह दिल्ली व अनेक राज्यांमध्ये अॅाक्सीजन तुटवडा निर्माण झाला होता. सध्या काही प्रमाणात स्थिती आटोक्यात आली असली तरी दिल्लीसह अन्य काही राज्यांत अॅाक्सीजनचा पुरवठा पुर्णपणे सुरळीत झालेला नाही. यावरून दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मोदी सरकारलाही फटकारले आहे. त्यावरून महाविकास आघाडीतील मंत्र्यासह देशभरातून मोदी सरकारवर टीका होत आहे. (Devendra fadanvis slams Shivsena over oxygen shortage issue)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारवर होत असलेली टीका अज्ञान आणि हेतुपूर्वक बदनामीच्या उद्देशाने होत असल्याचे म्हटले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. हे करताना त्यांनी खासदार संजय राऊत व महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केल्याचे दिसते. 'रोज सुबह होता है झूठ से सामना' अशी खोचक सुरवात करत त्यांनी काही मुद्यांच्या आधारे देशातील अॅाक्सीजन स्थिती मांडली आहे.

हेही वाचा : भयावह...गंगा नदीत वाहू लागले आता कोरोनाबाधितांचे मृतदेह?

'अज्ञान किंवा हेतुपूर्वक बदनामीच्या उद्देशाने खोटे पसरवले जात आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न वाचता कुणी एवढ्या उधळपणे लिहू किंवा बोलू कसे शकते? विशेषत: लोकशाहीचे खांब? क्रोनोलॅाजी समजून घ्या,' अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 

अॅाक्सीजनची अतार्किक मागणी

दिल्लीसह अनेक राज्यांकडून अॅाक्सीजनची अतार्किक आणि अवास्तव मागणी होत आहे. यामध्ये खोलवर गेल्यानंतर देशभरातून याबाबत प्रमाणाबाहेर अपेक्षा असल्याचे दिसते. त्यातून अनेक अॅाक्सीजन घोटाळे निघू शकतात. तसेच अॅाक्सीजनचे योग्य वाटप व वितरणासाठी केंद्र सरकारनेच राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे न्यायालयात सुचवले होते. केंद्राची बाजू मांडताना सॅालीसिटर जनरल यांनी पुरेसा अॅाक्सीजन असल्याची माहिती दिली आहे, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये नमुद केले आहे. त्यामुळे सातत्याने याबाबत अत्यंत खोटे का मांडले जात आहे, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. त्यांनी नुकतीच मुंबईतील कोरोना मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेकडून फडणवीसांवर खोचक टीका करण्यात आली होती. फडणवीस यांच्याकडून आभासी चित्र रंगवले जात असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला होता. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख