मोदी- ठाकरे सरकार हे पाहा : बेड मिळेना, ऑक्सिजन संपलेला; तीन दिवसांत मृत्युदरात एक टक्का वाढ

सध्या महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या ६,९४,४८० आहे.
Narendra modi-uddhav
Narendra modi-uddhav

मुंबई : ऱाज्यात तीन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. २२ ते २४ एप्रिलदरम्यान ती एक टक्का होती. शनिवारी राज्यात, ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. ६७६ जणांचा मृत्यू झाला. एप्रिलच्या तिसर्‍या, दुसर्‍या आणि पहिल्या आठवड्यात अनुक्रमे ०.६९, ०.५३ आणि ०.४८ टक्के मृत्युदर होता.

बेड आणि ऑक्सिजनची कमतरता, रुग्णांना उशिरा दाखल करणे आदी कारणांमुळे मृत्युदर वाढत असल्याचे राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या ६,९४,४८० आहे. चाचणी निदान अहवाल आणि उपचारांना विलंब होत आहे. शिवाय अहवाल येण्यास चार ते पाच दिवस लागतात. त्यात महत्त्वाचा वेळ जातो आणि गुंतागुंत निर्माण होते. त्यानंतर बेड नाहीत आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, असे जनरल फिजिशियन डॉक्टर रुपेश वडगावकर यांनी सांगितले.

वडगावकर यांनी १५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. ते ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाला संभाव्य कोरोना रुग्ण म्हणूनच पाहतात आणि त्या धर्तीवर उपचार सुरू करतात. मी सौम्य अँटीबायोटिक, अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स आणि इम्यून बूस्टर्सपासून सुरुवात करतो. जेणेकरून महत्त्वाचा वेळ वाचला जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना प्राणवायू पुरवणाऱ्या तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून आज दुपारपर्यंत तांत्रिक बिघाडामुळे वायूचा पुरवठा होऊ शकला नव्हता. त्यामुळे दुपारच्या वेळी महापालिकेने काही काळ ‘ऑक्सिजन अलर्ट’जारी केला होता. बोरिवली येथील भगवती रुग्णालयातील काही रुग्णांना दहिसर कोव्हिड केंद्रात हलवण्याची तयारीही केली गेली होती. सर्व यंत्रणा अलर्टवर आली होती, परंतु वेळीच ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाल्याने अनर्थ टळला. दरम्यान, तळोजा औद्योगिक क्षेत्रातील लिंडे कंपनी प्रशासनातर्फे प्लांट व्यवस्थित सुरू असल्याचे सांगण्यात आले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही कंपनीतर्फे करण्यात आले.


तळोजा औद्योगिक क्षेत्रातील लिंडे कंपनीत तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा मुंबईसह उपनगरांतील रुग्णालयांत केला जातो. मात्र आज कंपनीतील यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने मुंबईत मोठा अनर्थ निर्माण होण्याची शक्यता होती. दुपारी एकच्या सुमारास आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘ऑक्सिजन अलर्ट’जारी केल्याचे समजते. त्यानंतर तत्काळ युद्धपातळीवर सर्व रुग्णालयांतील राखीव साठ्यातील प्राणवायूच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला. भगवती रुग्णालयात प्राणवायूचा साठा संपत आला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्या ९८ पैकी काही रुग्णांना दहिसर येथील कोव्हिड केंद्रात हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, तेवढ्यातच प्राणवायूच्या ड्युरा सिलिंडरचा साठा रुग्णालयाला मिळाला. त्यामुळे रुग्णांना दहिसरला हलवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. प्राणवायू पुरवठ्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. तो सुरळीत असल्याचे इक्बालसिंह चहल यांनी सांगितले. 

भगवतीमध्ये दोन दिवसांचा प्राणवायू
सध्या भगवती रुग्णालयात दोनशे घनमीटर प्राणवायूचा साठा असून रात्रीही सिलिंडर मिळणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस पुरेल इतका साठा आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शांताराम कवडे यांनी सांगितले.

गुजरातमधून राज्यासाठी तीन टॅंकर प्राणवायू

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील गुजरातमधील हापा स्थानकातून रो-रो सेवेद्वारे रविवारी (ता. २५) तीन टॅंकर महाराष्ट्रासाठी रवाना झाले. तीन टँकरद्वारे ४४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) कळंबोलीमध्ये सोमवारी (ता. २६) सकाळच्या सुमारास पोहचणार आहेत. एकूण ८६० किमीचा प्रवास केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. मात्र, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने इतर राज्यांतून त्याचा पुरवठा केला जात आहे. त्यानुसार विशाखापट्टणमधून सात टॅंकर महाराष्ट्रात आणण्यात आले होते. आता आणखी तीन टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने  देण्यात आली.
रो-रो सेवेद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन आणताना विशेष काळजी घेण्यात आली आहे. रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर, पादचारी पूल आदींचा अंदाज घेऊन रो-रो सेवेद्वारे टँकर चालवण्यात येत आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या वेगासाठी गुरुत्वाकर्षण आणि ऑक्सिजनची आवश्यकता पाहता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष खबरदारी म्हणून ऑक्सिजन दाबाचे निरीक्षण करणे आणि सुरक्षा बाबी तपासणे सुरू होते, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com