मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल(बार्क)चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पार्थो यांना २ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान त्यांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागणार आहे. तपास अधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा तिथे हजर राहून तपासात सहकार्य करणे दासगुप्ता यांना अनिवार्य राहिल. तसेच पहिले सहा महिने महिन्याच्या पहिल्या शनिवारी तपास अधिका-यांकडे हजेरी लावणे पार्थो यांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर दर तीन महिन्यांनी पहिल्या शनिवारी त्यांना तपास अधिका-यांकडे हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
त्याचबरोबर खटल्यातील अन्य साक्षीदारांशी संपर्क सधणे किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्यासही दासगुप्ता यांना मनाई करण्यात आली आहे. 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ता हेच या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगत मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता.
कथित टीआरपी घोटाळाप्रकरणी दासगुप्ता यांना पुण्यातून २४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. मात्र,१५ जानेवारी रोजी दास यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २२ जानेवारी रोजी त्यांची रुग्णालयातून पुन्हा तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
त्यानंतर दासगुप्ता यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत प्रकृतीच्या कारणास्तव दोन आठवड्यांच्या तातडीच्या जामीनाची मागणी करत याचिका दाखल केली होती. पार्थो हे ६० दिवसांहून अधिक काळ तुरूंगात आहेत तसेच पार्थो सोडून या प्रकरणातील सर्वच आरोपी हे जामीनावर बाहेर असल्याचंही पार्थोच्यावतीने न्यायालयाच्या निर्दशानास आणून देण्यात आले. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.