मुंबईत कोरोना नियंत्रणात - Corona under control in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत कोरोना नियंत्रणात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पालिकेने 1 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यानची कोव्हिडच्या एकूण परिस्थितीची आकडवारी जाहीर केली आहे.

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी चांगली बातमी आली आहे. महिनाभरात मुंबईतील कोव्हिडची परिस्थिती नियंत्रणात आली असून सक्रिय रुग्णांची संख्या 29 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. सध्या मुंबईत केवळ 19,290 रुग्ण उपचार घेत आहेत.

 कोरोना रुग्णांची आकडेवारी खाली आल्याने सील केलेल्या इमारतींची संख्याही 30 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही 13 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे.

पालिकेने 1 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यानची कोव्हिडच्या एकूण परिस्थितीची आकडवारी जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाणही 1.06 वरून 0.41 पर्यंत खाली आले आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला असून तो 66 दिवसांवरून 171 दिवसांवर गेला आहे. ऑक्‍टोबरमध्ये मृत्युदर 2.5 इतका होता. त्यानंतर तो 4.4 इतका झाला होता. आता तो कमी होऊन 3.9 इतका झाला आहे. कोव्हिड रिक्त खाटांची संख्याही 4,986 वरून वाढून 7,817 इतकी झाली आहे. 

आयसीयू रिक्त खाटांच्या संख्येतही 225 वरून 561 इतकी वाढ झाली असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी दिली. 
पालिकेच्या "माझे कुटुंब... माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत "हेल्थ सर्व्हे टीम'ने आतापर्यंत 34.9 लाख कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. 35.2 लाख कुटुंबांची प्रत्यक्ष तपासणी केली आहे. इतकेच नाही, तर त्यांच्यात मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरच्या वापराबाबतही जनजागृती करण्यात आली आहे.

दिवसाला 16 हजार चाचण्या
पालिकेने दैनंदिन आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. ऑगस्टमध्ये दिवसाला 6,500 चाचण्या होत होत्या. चाचण्यांची संख्या आता 16 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचा दरही 82 वरून 89 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या ऑक्‍सिजन तपासणीलाही यश आले आहे. रुग्णालयात दाखल व्हाव्या लागणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्याही 24 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. रोजच्या बाधित व्यक्तींची संख्याही कमी होताना दिसत आहे. 

पालिकेच्या जनजागृतीला यश
शहरात 738 मेगा-होर्डिंगच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. 3100 बसवर आणि 1,750 बसथांब्यांवर "नो मास्क... नो एंट्री'चे संदेश लावून जनजागृती करण्यात आली. शिवाय दुकाने, कार्यालयीन इमारती इत्यादी ठिकाणी 20 लाखांहून अधिक संदेश फलक लावण्यात आले आहेत. 

40 लाखांहून अधिक पत्रके घराघरात आणि दुकानांमध्ये वाटण्यात आली. शहरात 244 मोफत चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाळीदरम्यानही योग्य काळजी घेऊन उत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी केले आहे.

सक्रिय रुग्ण ः 19,290 
कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण ः 0.41 
रुग्ण दुपटीचा कालावधी ः 171 दिवस
कोव्हिड रिक्त खाटांची संख्या ः 7,817
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख