काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेचा सल्ला..  - Congress struggle for the survival In Politics Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेचा सल्ला.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल

मुंबई : कॅाग्रेस सध्या विविध संकटाचा सामना करीत आहे. काँग्रेसला पुन्हा मजबूत बनण्यासाठी शिवसेनेने सल्ला दिला आहे. सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आले आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. Congress struggle for the survival In Politics Sanjay Raut

अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असे अग्रलेखात म्हटलं आहे.  

उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितिन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे.  प्रसाद हे काँग्रेसचे तरुण नेते. त्यांचे घराणे परंपरागत काँग्रेसचे. हे महाशय मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर विधानसभा, लोकसभा हरत राहिले. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितिन प्रसाद यांच्या येण्याचा उत्सव भाजपमध्ये साजरा केला जात आहे. यामागे उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित आहे. जितिन प्रसाद यांना भाजपमध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत. याचा दुसरा अर्थ असाही काढता येईल की, उत्तर प्रदेशातील भाजपचा पाठीराखा असलेला उच्चवर्णीय मतदार आता त्यांच्यापासून दूर जात आहे. 

जितिन प्रसाद यांचा भाजपाला उपयोग नाही
आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱ्यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत आहे. जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपमध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. प्रश्न तो नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उडय़ा मारू लागले आहेत हा आहे. पुन्हा हे फक्त उत्तर प्रदेशातच घडतेय असे नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात..

  1. पश्चिम बंगालात काँग्रेसचा खतरनाक पराभव झाला. केरळात काँग्रेसची स्थिती चांगली असतानाही सत्ता स्थापन करता आली नाही. आसामात संधी असतानाही काँग्रेस मागे पडली. 
  2. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही अशी मागणी ‘जी 23’चे बंडखोर नेते वारंवार करीत आहेत. काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. 
  3. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. 
  4. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. 
  5. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. देशाचा राजकीय समतोल बिघडविणारे हे चित्र आहे. 
  6. लोकशाहीला मारक असलेली ही स्थिती आहे. पक्षांतर्गत बंडाळय़ा या होतच असतात. त्यापासून भाजपसारखे पक्षही मुक्त नाहीत.
     
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख