फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? 'मनोरा' गैरव्यवहाराचा आरोप खोटा - Congress leader sachin sawant slams bjp over manora mla hostel allegations | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? 'मनोरा' गैरव्यवहाराचा आरोप खोटा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

सत्ता हव्यासापोटी सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा भाजप पुन्हा उघडा पडला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मुंबई : मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहित चौकशीची मागणी केली आहे. या आरोपांनंतर काँग्रेसने भाजपवरच पलटवार केला आहे. गैरव्यवहाराचा खोटा आरोप भाजपकडून केला जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. (Congress Leader Sachin Sawant slams BJP over Manora MLA hostel allegations)

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन सोबत ६०० कोटींचा करार केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द करण्यात आला. नवीन कंत्राटात केवळ वीजेच्या कामासाठी तब्बल २५० कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव ३०० कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. ६०० कोटी रुपयांच्या कामावर ३०० कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : भारतात का झाला कोरोनाचा विस्फोट? WHO च्या सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं कारण...

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भातखळकर यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. 'सत्ता हव्यासापोटी सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा भाजप पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बाधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या NBCC ला काम दिले. भातखळकर यांनी प्रकल्प किंमत ९०० कोटी कशी आली ही माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली,' अशी टीका सावंत यांनी केली आहे.

मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीने अकार्यक्षमतेकरिता काढले जाण्यापूर्वी २८ फेब्रुवारी २०२० ला विधिमंडळाला दिलेल्या ई टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्प किंमत ८१० कोटी सांगितली. नंतर ८ डिसेंबर २०२० रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत अंदाजपत्रकात ८७५.६२ कोटीं इतकी वाढवली, अशी माहिती सावंत यांनी दिली.

आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख