गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या तारखांवरून संभ्रम 

नागरिकांनीही ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रशासनाचे संकेतस्थळ पाहण्यास सुरुवात केली; परंतु त्यावर 13 ऑगस्टपर्यंत अनेक गाड्यांचे बुकिंग रद्द असल्याने त्यांचा हिरमोड झाला.
 गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या तारखांवरून संभ्रम 

ठाणे :  गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्यात, याविषयी राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. यामुळे चाकरमान्यांही आशा पल्लवित झाल्या आहेत. उद्यापासून (ता. 11) गणपती विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आणि याविषयीच्या चर्चांना उधाण आले. 

नागरिकांनीही ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रशासनाचे संकेतस्थळ पाहण्यास सुरुवात केली; परंतु त्यावर 13 ऑगस्टपर्यंत अनेक गाड्यांचे बुकिंग रद्द असल्याने त्यांचा हिरमोड झाला. 11 ऑगस्टविषयी रेल्वे अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम दिसून आल्याचे पाहावयास मिळाले. 

गणपती उत्सवासाठी जाण्यासाठी रस्ता वाहतुकीचा पर्याय, मुसळधार पाऊस, त्यात क्वारंटाईन कालावधी यामुळे कोकणात पोहचायचे कसे, असा प्रश्‍न कोकणवासीयांना पडला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी रोज धरत होती. यानुसार राज्य सरकारनेही रेल्वे प्रशासनाला याविषयी पत्रव्यवहार केल्याने कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच सोमवारी सकाळी समाजमाध्यमांवर 11 ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचा संदेश व्हायरल झाला. 

गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिल्याने चाकरमान्यांनीही सकाळपासून ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न सुरू केले. काही चाकरमान्यांनी रेल्वेस्थानक गाठून तिकीट खिडकीवरही चौकशी केली; परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. रेल्वेच्या संकेतस्थळावर 13 ऑगस्टपर्यंत कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द असल्याची माहिती येत होती, तर तिकीट खिडक्‍यांवरही कर्मचाऱ्यांनी अद्याप कोणत्याही विशेष गाड्यांची नोंद नसल्याची माहिती दिल्याने चाकरमान्यांचा हिरमोड झाला. 

याविषयी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता एका अधिकाऱ्याने 11 ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत; परंतु त्यांच्या वेळापत्रकाविषयी अद्याप माहिती आली नसल्याचे सांगितले. एका अधिकाऱ्याने गणपती विशेष लोकलची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले. यामुळे या तारखेविषयी रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. 

कोकणात गणपती सणानिमित्त विशेष लोकलविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडे आली नाही. याविषयी माहिती मिळताच ती तत्काळ जनतेपर्यंत पोहचवली जाईल. 
- शिवाजी सुतार, प्रमुख जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे  


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com