राज्यपाल-ठाकरे सरकारमधील संघर्ष पेटला; राज्यपालांना शासकीय विमान नाकारले - The conflict between the Governor and Thackeray government escalated | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल-ठाकरे सरकारमधील संघर्ष पेटला; राज्यपालांना शासकीय विमान नाकारले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उध्दव ठाकरे सरकारमधील वाद अनेकदा झाले आहेत. गुरूवारीही राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उध्दव ठाकरे सरकारमधील वाद अनेकदा झाले आहेत. गुरूवारीही राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे समजल्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. अखेर खाजगी विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले.

ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच राज्यपाल व सरकारमध्ये सातत्याने वाद होत आहेत. राज्यपालांकडून अनेकदा सरकारवर जाहीर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. मागील तीन महिन्यांपासून 12 जणांची नावे राज्यपालांकडे देऊनही अद्याप त्यावर सही झालेली नाही. त्यावरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच नाराजीही व्यक्त केली. हा वाद थांबताना दिसत नाही.

मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले होते. नियोजनानुसार त्यांनी आधीपासूनच विमानाची नोंदणी केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्यपाल विमानात जाऊन बसलेही. जवळपास 20 मिनिटे बसल्यानंतर त्यांच्या विमानाला सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना खाजगी विमानाने जावे लागले. 

अजित पवार म्हणाले, विमान नाकारल्याचे माहित नाही

राज्यपालांना शासकीय विमान नाकारल्याबाबत माहिती नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्रालयात गेल्यानंतर याबाबत माहिती घेऊ, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप नेते सुधीर मनगंटीवार, गिरीश महाजन यांनी राज्यपालांना विमान नाकारल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

 राज्यपालांना धमकी देणाऱ्यांनी आधी नीतिमत्ता शिकावी : फडणवीस

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच राज्यपालांवर टीका केली आहे. 'राज्यपालांनी आता अंत पाहू नये. अन्यथा प्रत्यक्ष भेटून त्यांना कधी सही करणार हे विचारावे लागेल,' अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांसह सरकारवर निशाणा साधला. राज्यपालांना धमकी देणाऱ्यांनी आधी नीतिमत्ता शिकावी, असा टोला त्यांनी लगावला.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले होते की, 'सर्व अटी-नियमांचे पालन करून राज्यपालांना 12 जणांची यादी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना याबाबत पत्र लिहिले आहे. तरीही राज्यपालांकडून सही करण्यात आलेली नाही. अजून किती वाट पहायची. आता अंत पाहू नये, अन्यथा त्यांना भेटून याबाबत विचारणा करावी लागेल.'

याबाबत फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, बारा आमदारांच्या मुद्यावर राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. योग्य न वाटल्यास सरकार पुढील कार्यवाही करू शकेल. पण राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना सरकारमधील मंत्री ज्या भाषेत धमक्या देतात, हे कोणत्या संविधानात बसते. ही कुठली नीतिमत्ता आहे? ते आधी शिका मग राज्यपालांवर बोला, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख