The commissioner gave the job of washing dishes to the graduate girl at his bungalow  | Sarkarnama

पदवीधर युवतीला आयुक्तांनी दिले आपल्या बंगल्यावर भांडी घासण्याचे काम...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 जुलै 2020

एका पदवीधर युवतीला आयुक्तांनी स्वतःच्या बंगल्यावर झाडू मारण्याचे, कपडे धुण्याचे आणि भांडी घासण्याचे काम दिले. तिने नकार दिल्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

मुंबई : वसई-विरार महापालिकेत टंकलेखनाचे काम करणाऱ्या एका पदवीधर युवतीला आयुक्तांनी स्वतःच्या बंगल्यावर झाडू मारण्याचे, कपडे धुण्याचे आणि भांडी घासण्याचे काम दिले. तिने नकार दिल्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या युवतीच्या मागे उभी राहिली असून याबाबत मनसे आता आयुक्तांना जाब विचारणार आहे. 

या युवती बाबत घडलेला प्रकार सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने तिला आयुक्तांनी बोलवून घेतले. "तू मनसेला याबाबत का सांगितले," असे म्हणत तिला कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती मनसेचे ठाणे-वसई जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे. याबाबत जाधव यांनी एक व्हिडिओ फेसबुकवरून शेअर केला आहे. योगिता जाधव या युवतीबाबत झालेल्या या प्रकाराबाबत नेटिझन्सची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. आयुक्तांना याबाबत जाब विचारावा, अशी मागणी नेटिझन्सने केली आहे.

योगिता जाधव हिचे वडील वसई-विरार महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याजागेवर योगिती ही सफाई कामगार म्हणून रूजू झाली आहे. ती पदवीधर, हुशार असल्याने तत्कालिन आयुक्तांनी तिला टंकलेखनाची जबाबदारी दिली होती. पण सध्याच्या आयुक्तांनी तिला आपल्या बंगल्यावर झाडू मारण्याचे व भांडी धुण्याचे काम दिले होते. या कामाला तिने नकार दिल्यामुळे आयुक्तांनी तिला कोवीड सेंटरमध्ये रूग्णांच्या चादरी धुण्याचे काम दिले. याला योगिता जाधव हिने विरोध केला होता. हे प्रकरण उच्चन्यायालयात गेले होते.  "नेमणूक केलेल्या कामाव्यक्तीरिक्त कुठलेही काम योगिता जाधव यांना देऊ नये," असा आदेश न्यायालयाने दिला आहे. यानंतरही आयुक्तांनी तिला अशी वागणूक दिली आहे. याबाबत अविनाश जाधव हे आयुक्तांना भेटणार  आहेत.  
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा  : राज्यात 10 लाख लोकसंख्येमागे अवघ्या 198 कोरोना चाचण्या

मुंबई  : देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे केवळ १९८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोना चाचण्या करणाऱ्या २२ राज्यांमध्ये महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा, त्रिपुरा, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्यांची संख्या कमी आहे. दुसरीकडे राज्य सरकारने आधीपासूनच देशात सर्वांत जास्त चाचणी दर महाराष्ट्रात असल्याचा दावा केला आहे.  राज्यात  १६ जुलैपर्यंत कोरोना चाचणी करणाऱ्या १०६ योगशाळा आहेत. यापैकी ६१ प्रयोगशाळा सरकारी आणि ४४ खासगी आहेत.  
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख