म्हाडाच्या दोन हजार 908 सदनिकांसाठी गुढीपाडव्याला प्रारंभ

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे.
 mhada .jpg
mhada .jpg

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळातर्फे दोन हजार 908 सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला गुढीपाडव्या निमित्त प्रारंभ झाला. या माध्यमातून 'सन 2022 सर्वांसाठी घरे' या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य सरकारने आश्वासक पाऊल टाकले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते गृहनिर्माण योजनेतील दोन हजार 908 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई आदी उपस्थित होते.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. प्रास्ताविक 'म्हाडा' च्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी केले. 

29 मे रोजी सोडत
 
https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका आणि अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. 29 मे रोजी प्राप्त अर्जाची सोडत पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात सकाळी दहा वाजता होणार आहे.

20 टक्के सर्वसमावेशक योजना

या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी पुणे महापालिका हद्दीतील लोहगाव, बाणेर, हडपसर, धनकवडी, खराडी, वडगाव शेरी, येवलेवाडी येथील 300 सदनिकांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळे निलख, ताथवडे, किवळे, पुनावळे, मोशी, वाकड, रावेत,  रहाटणी, चरोली, चिखली, उरवडे, डुडुळ गाव येथील 455 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

या योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी जुळे सोलापूर येथे 5 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी जुळे सोलापूर येथे 63 सदनिका, चाकण-म्हाळुंगे-इंगळे येथे 499 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी चाकण-म्हाळुंगे-इंगळे, चिखली येवलेवाडी, वडमुखवाडी येथे 862 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी चाकण-म्हाळुंगे-इंगळे येथे 67 सदनिका उपलब्ध आहेत.
 
14 मेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी

13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व नोंदणीकृत अर्जदार ऑनलाईन अर्ज करु शकतील. ऑनलाईन अर्ज नोंदणी 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. 15 मे रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. 16 मे रोजी संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com