राज्याला धोक्यात घालाल तर तुरुंगात टाकू; मुख्यमंत्र्यांचा इशारा - CM Udhhav Thakrey gives warning about corona restrictions | Politics Marathi News - Sarkarnama

राज्याला धोक्यात घालाल तर तुरुंगात टाकू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

राज्यात कोरोना वाढत असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

मुंबई : राज्यात कोरोना वाढत असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी कोणी मला खलनायक ठरविले तरी चालेल. पण राज्याला धोक्यात घालणार असाल तर गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लॉकडाऊन करणे आमची इच्छा नाही. पण विरोधकांना शेठजींची, व्यापाऱ्यांची चिंता आहे. त्यांची चिंता जरूर करा, असा टोलाही त्यांनी लगावला. युके, जर्मनी, इस्त्राईलमध्येही लॉकडाऊन करत आहेत. तेथील आरोग्य व्यवस्था अमरावतीपेक्षा कमी आहे का? कोणी खलनायक ठरविले तरी जनतेच्या हिताची काळजी घेणारच. राज्याशी बांधील आहे. त्यांची सुरक्षा, आरोग्याची व्यवस्था हे सरकारचे काम आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

कोणत्या तरी एका वर्गासाठी संपूर्ण राज्याला धोक्यात घालणार असला तर गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. या संकटाशी कुणी खेळ करून नका. इतर राज्यात काही मंत्री, आमदार, खासदार मृत्यूमुखी पडला आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी, मी जबाबदार या योजनांची थट्टा करून नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

हेही वाचा : भाजपला धक्का : दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभव

महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे

आर्थिक पाहणी अहवालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधासनभेत आज विरोधकांवर चांगलेच भडकले. अहवाल तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी कोरोनावर अहवाल तयार केला आहे. ही थट्टा असल्याचे सांगत मुख्यमंत्री यांनी बिहारशी तुलना करून काढण्यात आलेल्या निष्कर्षाच्या आधारे विरोधकांकडून महाराष्ट्राला बदनाम केले जात असल्याची टीका केली. 

कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. बिहारचा कोविडमधला फोलपणा समोर आला आहे. तिथे होणाऱ्या चाचण्या तसेच इतर बाबींचे सत्य समोर आले आहे. हे निकष धरून महाराष्ट्राला बदनाम करत आहात. महाराष्ट्रातील यंत्रणेवर विश्वास न ठेवता महाराष्ट्राला बदनाम करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. 

दाराआडही कधी खोटे बोलणार नाही

कोरोना काळात आम्ही एकही रुग्ण किंवा मृत्यू लपवला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. आम्ही कधीही खोटी माहिती दिली नाही. खोटेपणा करणे आमच्या रक्तात नाही. बंद दाराआडही कधी बोलणार नाही. पाठ थोपटून घ्यायला, काम करणारी छाती असावी लागते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

पीएम केअर फंडची पोलखोल करा

महाराष्ट्रातील जनतेसाठी सोयीसुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरू केले. विरोधकांचा फंड महाराष्ट्राकडे न येता दिल्लीकडे गेला, असे मुख्यमंत्री म्हणतातच भाजपच्या काही आमदारांनी आक्षेप घेतला. आम्ही निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फंडची पोलखोल करताना पंतप्रधान फंडचा हिशेब कोण देणार. पण ते महनीय व्यक्ती आहेत. त्यांचा फंड विचारण्याची कोणामध्ये हिंमत नाही. प्रश्न विचारला की देशद्रोह. ही इथली लोकशाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख