लशीच्या प्रस्तावावर अजित पवारांची सही, पण निर्णय मुख्यमंत्री ठाकरेच घेणार... - CM Uddhav Thakarey will take a decision on the free vaccination says ajit pawar | Politics Marathi News - Sarkarnama

लशीच्या प्रस्तावावर अजित पवारांची सही, पण निर्णय मुख्यमंत्री ठाकरेच घेणार...

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

महाराष्ट्रात मोफत लसीकरणावरून अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

मुंबई : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लशीची किंमत जाहीर केली होती. या किंमतीवरुन अजूनही गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाला मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात मात्र अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. दोन मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबतचे ट्विट केले. पण ते काहीवेळाने डिलिट केले. त्यामुळे मोफत लसीकरणाबाबत संभ्रम वाढला. राज्य सरकारकडून अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपकडून या गोंधळावरून जोरदार टीका केली जात आहे.

मोफत लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट सांगितलं नाही. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोफत लशीकरणाच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. पण याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव येणार आहे. यामध्ये त्यावर चर्चा होईल. मोफत लसीकरणावर थेट भाष्य करणार नाही. आर्थिक भाराचे निर्णय मुख्यंत्री घेतात. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत पवार यांनी मोफत लसीकरणाबाबत संकेतही दिले. लसीबाबत ग्लोबल टेंडरवरही चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन प्रतिडोस ६०० रुपयांना मिळेल. खासगी रुग्णालयांना ही लस १ हजार २०० रुपयांना मिळेल. इतर देशांसाठी या लशीचा दर १५ ते २० डॉलर असेल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. सिरमने राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

भारत सरकारचा दोन्ही लशींचा खरेदीदर 150 रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या लशी राज्यांना मोफतच देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु, राज्ये आणि खासगी रुग्णालयांसाठी लशीची किंमत कमी करण्याबाबत मंत्रालयाने काहीच उल्लेख केलेला नाही. त्यानंतर आज मलिक यांनी राज्य सरकारकडून नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख