मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा 

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही.
 Uddhav Thackeray .jpg
Uddhav Thackeray .jpg

चिपळूण : केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई जाहीर करण्यात येईल. तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. त्यांनी आज (ता. २५ जुलै) चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Chief Minister's big announcement; Independent system on the lines of NDRF in the districts) 

यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या (NDRF) धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच, पण ते अधिक सक्षम करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचनादेखील मी प्रशासनाला केल्या आहेत. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हला ही एकदाच कर्ज द्या. पुन्हा कधीच भीक मागणार नाही, आमचे मायबाप तुम्हीच आहात. आम्हाला फक्त जगवा, असा टाहोच चिपळूणच्या व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर फोडला. व्यापाऱ्याचा टाहो ऐकून मुख्यमंत्रीही स्तब्ध झाले. या व्यापाऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

शनिवारी तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूण येथील पुरपरिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी व्यापारी आणि स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली. 

पूर आला त्यात आमचे मोठे नुकसान झाले. आमच्यावर कर्ज आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येते त्याच पद्धतीने आम्हालाही शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी दोन टक्के व्याजाने तेवढेच कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीच भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला फक्त जगवा, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्याला दिले.

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com