मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले केंद्राचे आभार... - Chief minister Uddhav Thakare thanked the central government   | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले केंद्राचे आभार...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी घराबाहेर असतो. त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे सांगितले होते.  

मुंबई:   ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे नितांत गरजेचे आहे.  त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे.  विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी घराबाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातही लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (दि. २२ मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई शहरातील कोरोना रुग्णदुप्पटीचा कालावधी आठवडाभरातच १८६ दिवसांवरुन ९७ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील कोरोनाचा धोका आणखी वाढल्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात २ हजार ३४२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात १ हजार ७८९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 

पुण्यात काल दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला. त्यातील २ रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर राज्यात एकूण २ लाख १५ हजार २४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९.२२ % झाले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.  वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख