महाराष्ट्रद्वेष्टे कोण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे : अतुल भातखळकर  - Chief Minister Uddhav Thackeray should announce who is hating Maharashtra: Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रद्वेष्टे कोण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे : अतुल भातखळकर 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा कट उधळला, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे.

मुंबई : महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा कट उधळला, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची उत्तरे न देता मुख्यमंत्री हा बागुलबुवा निर्माण करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना वरील विधान केले होते. त्याद्वारे त्यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याचा समाचार घेताना भातखळकर यांनी त्यांना वरील टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशी शेखी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या आड दडून टीका करण्यासारखेच आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रद्वेष्टे कोण हे त्यांनी सरळसरळ सांगून नावे घेतली असती तर बरे झाले असते. मात्र, कायद्याचा गैरवापर करून लोकांना अटक करणे, त्यांना मारहाण करणे, हे प्रकार होत आहेत ते न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असेही भातखळकर यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

आरे अहवाल उघड करण्याचे आव्हान 

"आरे' मधील मेट्रो कारशेड संदर्भातील निर्णय जनतेला योग्य वेळी सांगू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. पण, ती योग्य वेळ कधी येणार, असा प्रश्न विचारून भातखळकर पुढे म्हणतात की, तुमच्याच सरकारने नेमलेल्या सौनिक समितीने "आरे' मध्येच मेट्रो कारशेड करा, हे सांगितले आहे, त्यावर तुमचे उत्तर काय आहे. हा अहवाल तुम्ही जनतेसाठी खुला का करत नाही, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार कधी देणार, शेतकऱ्यांना मदत कधी पोचणार, राज्यातील मंदिरे कधी उघडणार, या लोकांच्या दृष्टीने जीवनमरणाच्या प्रश्नांची उत्तरे न देता, त्यांचे लक्ष अन्य गोष्टींकडे वळविण्यासाठी महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा कट उधळला, असा बागुलबुवा मुख्यमंत्री ठाकरे उभा करत आहेत, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख