कोकणातील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे.
The Chief Minister took stock of the flood situation in Konkan .jpg
The Chief Minister took stock of the flood situation in Konkan .jpg

मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिली आहे. त्याच बरोबर रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (The Chief Minister took stock of the flood situation in Konkan) 

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत, अशी माहिती दिली.  

नद्यांच्या पाणी पातळीबाबत माहिती देण्यात आली

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७. ८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १. ७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळेखेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य सुरु केले आहे.

रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला असून धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून ते देखील ६३ टक्के भरले आहे. बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला. त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com