मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने राज्यात खंडणीखोर मोकाट

कंत्राटदारांना शिवसेना नेत्यांकडून धमकावले जात असल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने राज्यात खंडणीखोर मोकाट
Uddhav Thackreay and Atul Bhatvalkar (11).jpg

मुंबई : राज्यात सध्या उद्योजकांना खंडणीसाठी मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार सर्रास घडू लागल्याने उद्योगधंदे अन्य राज्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. त्याचमुळे राज्याच्या जीएसटी उत्पन्नात पावणेचार हजार कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे. सरकारच्या वसुलीखोर धोरणामुळे राज्य आर्थिक अधोगतीकडे जात असल्याची टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आज केली. (Chief Minister ignored the ransom seekers in the state) 

महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये तीन हजार 728 कोटी रुपयांची घट झाली आहे. केंद्राच्या तसेच अनेक राज्यांच्या जीएसटी उत्पन्नात ऑगस्टमध्ये वाढ झाली असताना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या उत्पन्नात एवढी मोठी घट होणे चिंताजनक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात मोठी असूनही येथे  राज्याच्या उत्पन्नात घट होण्यास आघाडी सरकारचा कारभार जबाबदार आहे, अशी खरमरीत टीका भातखळकर यांनी केली. 

सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने उद्योजकांना खंडणीसाठी धमकावले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना शिवसेना नेत्यांकडून धमकावले जात असल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी याची दखल न घेतल्याने खंडणीखोर मोकाट सुटले आहेत, असा आरोपही भातखळकर यांनी केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योगस्नेही ( इझ ऑफ डुईंग बिझनेस ) मानकात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होता. मात्र आघाडी सरकारच्या काळात यातील महाराष्ट्राचे स्थान 13 व्या क्रमांकापर्यंत घसरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची व टाळेबंदीची भीती दाखवत असल्याने उद्योजक, उद्योगपतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक मंदावली आहे, तर खंडणीच्या धमक्यांमुळे अनेक उद्योजक राज्याबाहेर स्थलांतर करीत असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला.

Related Stories

No stories found.