देशमुखांच्या गृहमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! शरद पवार उद्या चर्चा करणार - Chief Minister to decide about anil Deshmukh says sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुखांच्या गृहमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! शरद पवार उद्या चर्चा करणार

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

नवी दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पण त्या पत्रावर त्यांची सही नाही. तसेच पत्रातील आरोपाबाबत कोणतेही पुरावे नाहीत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे अधिकार आहेत. त्यांनी चौकशी करून निर्णय घ्यावा. याबाबत सर्वांशी चर्चा केली जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांच्या गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रातील परमबीर सिंह यांच्या आरोपांवर बोलताना पवार म्हणाले, परमबीर यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यांनी अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत सापडलेल्या स्फोटकांबाबत माहिती दिली होती. त्यांनी पत्रात उल्लेख केलेले 100 कोटी कुणाकडे गेले याचा पत्रात उल्लेख नाही. बदली झाल्यानंतरच परमबीर यांनी हे आरोप केले आहेत. आयुक्त असताना त्यांनी असे कोणतेही आरोप केले नाहीत. आरोपांबाबत कोणतेही पुरावे नाहीत. तसेच वाझेंना परत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनीच घेतला होता. हा निर्णय गृहमंत्र्यांचा नाही.

चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा. देशमुखांच्या पदाचा राजीनामा घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत पण त्याआधी आमच्याशी चर्चा होईल. देशमुख यांचे म्हणणेही ऐकून घेतले जाईल. उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय आहे प्रकरण?

गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत असत. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांनी जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असाही आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख