Check the Kovid Center worth Rs 40 crore ... Letters from BJP MLAs ... | Sarkarnama

चाळीस कोटीच्या कोविड सेंटरची चैाकशी करा...भाजप आमदाराचे पत्र...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 जुलै 2020

निविदा न मागवता दुप्पट रक्कम खर्च करून कोविड सेंटर उभारल्याप्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपचे अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमित साटम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. 

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलात एमएमआरडीएने निविदा न मागवता दुप्पट रक्कम खर्च करून कोविड सेंटर उभारल्याप्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपचे अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमित साटम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. 

या केंद्राच्या उभारणीसाठी चाळीस कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च आला होता. त्यातील 22 कोटी रुपये केवळ तात्पुरती शेड उभारण्याच्या कामासाठी खर्च केल्याचे दाखवले आहे. त्यातील साहित्याच्या किमतीही बाजारभावापेक्षा खूपच जास्त दाखविण्यात आल्या आहेत.

याच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठीही एमएमआरडीए ने निविदा मागविल्या नाहीत. हे सर्वच काम फार जास्त किमतीत दिले आहे.  याच कामासाठी आपण स्वतः निविदा मागविण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्याला त्याहीपेक्षा वीस ते चाळीस टक्के कमी दराने निविदा मिळाल्या होत्या. त्यामुळे या सर्वच कामाच्या प्रकरणी संशयाला जागा आहे, असा दावा साटम यांनी या पत्रात केला आहे. 

हेही वाचा : मोदींना सातव म्हणाले , "अब तू दवाई खरीद या विधायक तेरे जमीर पर निर्भर है...." 

मुळात हे कोविड केंद्र उभारल्यावर त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त खाटा रिक्त आहेत. त्यामुळे एवढे मोठे कोविड केंद्र उभारण्याची गरज होती का, नेमक्या कोणत्या हेतूंसाठी ते उभारण्यात आले, यामुळे कोणाचा फायदा झाला, असे प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत, असेही साटम यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो संदेशही प्रसिद्ध केले आहेत. गेल्याच आठवड्यात याच केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका महिलेला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे हे एवढे मोठे केंद्र का उभारले अशीही शंका येते. एमएमआरडीए ने अवैध मार्गाने कोणालातरी फायदा पोहोचविण्यासाठी हे काम केल्याचेही साटम यांनी म्हटले आहे. 

या केंद्राच्या उभारणीत एमएमआरडीए ने पारदर्शकतेच्या तत्त्वाला पूर्णपणे तिलांजली दिली आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून या गैरप्रकारास जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशीही मागणी या पत्रात आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रेही त्यांनी तक्रारीसोबत जोडली आहेत. यापूर्वीही गोरेगावच्या नेस्को संकुलात उभारण्यात आलेल्या कोविड केंद्राच्या उभारणीत झालेल्या नियमभंगासंदर्भातही साटम यांनी लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी केली होती.
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख