अर्णब गोस्वामी मारहाणप्रकरणी राम कदमांनी घेतली राज्यपालांची भेट, केली ही मागणी  - In the case of Arnab Goswami's assault, Ram Kadam met the Governor and made this demand | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामी मारहाणप्रकरणी राम कदमांनी घेतली राज्यपालांची भेट, केली ही मागणी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नाईक मृत्यूप्रकरणी गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या नऊ पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. 

नाईक मृत्यूप्रकरणी गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताना झटापटी केली होती आणि मारहाण केली होती असा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. गोस्वामींवर झालेल्या कारवाईने भाजपचे संतापले आहेत. गोस्वामीला अटक केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते चंद्रकांतदादांपर्यंत सर्वच भाजप नेत्यांनी या अटकेचा निषेध केला आहे. 

आज तर राम कदम यांनी या मुद्याकडे लक्ष वेधक राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. यावेळी कदम यांनी राज्यपालांना एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की ज्या नऊ पोलिसांनी गोस्वामी यांना मारहाण केली आहे त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे तसेच या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

राम कदम यांनी तसे ट्‌विट केले असून राज्यपालांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. पोलिसांविषयी पूर्ण आदर आहे पण, मारहाण आपणास मान्य नाही असेही कदत यांनी म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण ! 

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे 

अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे 5 कोटी 40 लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. 

त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली.

या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख