धक्कादायक : महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून दोन महिला सहकाऱ्यांचा विनयभंग - BMC officer arrested for sexually harassing clerk says Mumbai Police | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून दोन महिला सहकाऱ्यांचा विनयभंग

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मार्च 2021

महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

मुंबई : कार्यालयातील दोन सहकारी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. या अधिकाऱ्यानी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेच्या जी (नॉर्थ) वॉर्डमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागात आहे. त्याच्याच कार्यालयात तक्रार करणारी महिला लेखनिक पदावर काम करते. या महिलेने सहाय्यक आयुक्तांकडे अधिकाऱ्याची तक्रार केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. 

महिलेची तक्रार आल्यानंतर बुधवारी तातडीने तीन महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. चौकशी सुरू असतानाच त्याच विभागातील आणखी एक महिला कर्मचारी पुढे आली. त्यांनीही अशीच तक्रार केली आहे. त्यानुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. समितीचा अहवाल पालिकेला सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये दोन्ही महिलांचे जबाब घेण्यात आला आहे. 

शिवाजी पार्क पोलिस स्टेशनचे अधिकारी हा प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस तपास व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अधिकारी सुपरवायझर असून या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाचे काम आहे. संबंधित अधिकाऱ्याला कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल यापूर्वीही निलंबित करण्यात आले आहे. 

Edited By Rajanand More 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख