मुंबई : आम्ही सत्तेत होतो तेव्हा विरोधी पक्ष मजबूत नव्हता. आमच्या सारखा विरोधीपक्ष मिळाल्याने हे सरकार नशीबवान आहे. पण फार काळ विरोधी पक्षात रहायचे नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे ''मी पुन्हा येणार''ची आठवण करून दिली. 'त्यांनी बेईमानी केली म्हणून आम्ही विरोधी बाकावर बसलो', असे सांगत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.
राज्यातील विधासभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक भाषणात फडणवीस यांच्याकडून ''मी पुन्हा येणार'' ही घोषणा दिली जात होती. पण निकालानंतर शिवसेनेने साथ सोडल्याने त्यांना पुन्हा सत्ता मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. महाविकास आघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपचे नेते अधूनमधून करत असतात.
प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी फडणवीस यांनीही विरोधी पक्षात फार काळ रहायचे नाही, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, जोवर विरोधी पक्षात आहोत तोवर जनतेसाठी काम करायचे आहे. आज देशामध्ये मोदींसोबत कुणीच मुकाबला करू शकत नाही. देशातील विरोधी पक्षांची विश्वासर्हता संपल्यानंतर ते विविध शक्ती उभ्या करतात. दिल्लीत हेच पाहायला मिळाले, अशी टीका फडणवीस यांनी केली.
आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन देणारे पक्षही कृषी कायद्याला विरोध करत आहेत. काही शक्तींना हे आंदोलन संपू नये असे वाटत होते. स्वतःला आंदोलन करता येत नाही. पण अशी बिनचेहऱ्याची लोकं घुसवली जातात, असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवारांच्या टीकेवरून फडणवीसांची दरेकरांवर स्तुतीसुमने
पद हे मिरवण्यासाठी नसते तर ती एक जबाबदारी असते. शरद पवार साहेब जे बोलले त्याबाबत तुम्हाला वाईट वाटले. पण अशा गोष्टीची काळजी करायची नसते. एकदा एका विरोधीपक्ष नेत्याला पवार साहेब तोडपाणी करणारा विरोधी पक्षनेता म्हणाले होते. पण आज तोच त्यांच्या जवळ आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांची पाठराखण केली.
आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात भेंडी बाजारातील महिला होत्या, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली होती. त्यांनतर ''हे वक्तव्य ऐकून मला लाट वाटत आहे. कारण मीही विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होता,'' अशी टीका शरद पवार यांनी दरेकरांवर केली होती.
Edited By Rajanand More

