मदन शर्मा मारहाणप्रकरणी भाजप हायकोर्टात जाणार 

आपण यापुढे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत राहू, असे त्यांनी नंतर राजभवनाबाहेर पत्रकारांना सांगितले.
BJP will go to High Court in Madan Sharma  Beating case
BJP will go to High Court in Madan Sharma Beating case

मुंबई : शिवसैनिकांनी मारहाण केलेले कांदिवलीचे माजी नौसैनिक मदन शर्मा यांनी आज (ता. 15 सप्टेंबर) मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

आपण यापुढे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत राहू, असे त्यांनी नंतर राजभवनाबाहेर पत्रकारांना सांगितले. तर मारहाणप्रकरणी भाजप नेते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. 

या वेळी शर्मा यांनी राज्यपालांना निवेदन देऊन राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला कठोर पावले उचलण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली.

निवृत्त नौसैनिकाला मारहाण होऊनही सरकारमधील कोणीही मंत्री वा नेता आपल्याला भेटण्यास आला नाही. उलट शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर मी नौसैनिक नाही, अशी विधाने केली व मारहाणीचे समर्थनही केले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार मला न्याय देईल, असे वाटत नसल्याने आपण हल्लेखोरांवर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना सूचना द्याव्यात, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

मी भाजप व संघाचा समर्थक असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी मला मारहाण केली होती, त्यामुळे मी आता यापुढे संघ व भाजपच्या बरोबरच राहीन हे घोषित करतो, असेही शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. 

या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात अनेक कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. संशयित शिवसैनिकांविरुद्ध पूर्वी गुन्हे नोंदविले आहेत का? असे न्यायालयाने विचारूनही त्याची माहिती पोलिसांनी दिली नाही.

आरोपींनी शर्मा यांना मोबाईलवर धमकावल्याचे संभाषणही पोलिसांनी सादर केले नाही, किंबहुना त्यांनी ते मिळविण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू, असेही भातखळकर म्हणाले. 

या प्रकरणी अद्यापही राजकीय दबावाखाली पोलिसांनी कठोर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मारहाण करणारे शिवसेनेचे दोनही शाखाप्रमुख अद्यापही मोकाट आहेत.

अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आश्वासनानंतरही राजकीय दबावाखाली कारवाई होत नाही. उलट शर्मा हे नौसैनिक नव्हते असे बोलून शिवसेना नेते संजय राऊत यांनी जवानांचा अपमान केला आहे, या सर्वच बाबी निषेधार्ह आहेत, असेही भातखळकर यांनी या वेळी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com