उंदरांचा बंदोबस्त सेनेच्या वाघाला जमत नाही ; तो काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर आहे! - BJP Sheetal Desai criticizes Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

उंदरांचा बंदोबस्त सेनेच्या वाघाला जमत नाही ; तो काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर आहे!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 जून 2021

शिवसेनेच्या वाघाने आता वानप्रस्थाश्रम स्वीकारावा हे उत्तम

मुंबई : ''महापालिका रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू होणे ही लाजिरवाणी घटना आहे.  उंदरांचा बंदोबस्त करणेही शिवसेनेच्या वाघाला आता जमत नाही. शिवसेनेचा वाघ आता वृद्ध झाल्याचीच ही लक्षणे आहेत. त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा हे उत्तम,'' अशी बोचरी टीका भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख शीतल देसाई यांनी केली आहे. BJP Sheetal Gambhir Desai criticizes Uddhav Thackeray

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या मुंबईचा कारभार असा चालत असेल तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची मान खाली घालायला लावणारेच आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हा प्रकार झाला होता. त्यानंतर अनेक महापालिका रुग्णालयात उंदीर-घुशी, कुत्री-मांजरे यांचा मुक्त संचार असल्याचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाले होते. त्यासंदर्भात देसाई यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

एवढी वर्षे उंदीर मारण्यावर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले तरी उंदरांमुळे होणारे नुकसान थांबवणे महापालिकेला जमत नाही. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करूनही त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. आता भटक्या मांजरांचीही संख्या वाढत असल्याने त्यांचीही नसबंदी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्याचीही अवस्था भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीप्रमाणेच होणार हे निश्चित आहे.

पाळीव कुत्र्यांना फिरायला नेऊन रस्त्यावर घाण करणारे श्वानप्रेमी, वाटेल तेथे कबुतरांना खायला घालून नागरिकांना श्वसनविकार देणारे पक्षीप्रेमी यांच्यावर कायदेशीर नियंत्रण ठेवणेही पालिकेला जमत नाही. रस्त्यांवर पडणारे खड्डे, पावसात तुंबणारी मुंबई, बेबंद वाढणाऱ्या झोपड्या यापैकी कोणत्याही समस्येवर मात करणे शहराच्या कारभाऱ्यांना जमत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

शिवसेना व त्यांचे लाडके कंत्राटदार यांच्यात टॉम अँड जेरी सारखा उंदीर मांजराचा खेळ सुरु असतो. ते वरवर लटकेच भांडतात पण पुन्हा मालिदा खाण्यासाठी एकत्र येतात. कधीतरी कंत्राटदाराच्या गरीब कर्मचाऱ्याला मारहाणीचे नाटक होते, कधीतरी पालिका समितीत गुरगुर होते, पण ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी असते. याच वृत्तीमुळे नागरिकांना या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. शिवसेनेचा वाघ आता वृद्ध झाला असून तो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर झाला आहे. त्यामुळे उंदरांवर देखील म्यांव करण्याची ताकद त्या वाघात राहिली नाही. या वाघाने आता वानप्रस्थाश्रम स्वीकारून नागरिकांना मोकळे करावे, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे.
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख