राज्य सरकारने मागणी केल्यास मुंबईहून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे - bjp mp gopal shetty on special train for konkan ganesh festival | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारने मागणी केल्यास मुंबईहून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 जुलै 2020

मागीलवर्षी मुंबईतून पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणारी गणपती विशेष गाडी सुटली नव्हती. पण त्यापूर्वी दोन वर्षे ही गाडी सोडण्यात आली होती.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील नायगाव आणि मध्य रेल्वेवरील जूचंद्र ही स्थानके जोडण्याच्या कामास लवकरच सुरुवात होईल. तसेच राज्य सरकारने मागणी केली तरच गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाण्यासाठी विशेष गाडी सोडता येईल, असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितल्याची माहिती भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी 'सकाळ'ला दिली. 

नायगाव आणि जूचंद्र ही स्थानके जोडणारा रेल्वेमार्ग टाकण्याच्या मागणीसाठी शेट्टी यांचा सतत पाठपुरावा सुरु आहे. आज यासंदर्भात गोयल यांनी संबंधितांशी ऑनलाईन चर्चा करून वरील माहिती दिली. या मार्गासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण झाले असून संपूर्ण सर्वेक्षण एक-दोन महिन्यांत पूर्ण होईल व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

मागीलवर्षी मुंबईतून पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणारी गणपती विशेष गाडी सुटली नव्हती. पण त्यापूर्वी दोन वर्षे ही गाडी सोडण्यात आली होती. मूळ गाव कोकणात असलेले हजारो नागरिक उत्तर मुंबईत असल्याने अशी गाडी सोडण्यासाठी शेट्टी आग्रही आहेत. पश्चिम रेल्ववरून कोकणात जाणारी ही गाडी वसई दिवा मार्गावर नेण्यासाठी वसईला तिचे नेहमीचे इंजिन बदलून तिला उलट मागील दिशेला इंजिन लावावे लागत होते. मात्र आता नायगाव ते जूचंद्र मार्ग (वसई बायपास) झाल्यास हा त्रास वाचेल व पश्चिम रेल्वेवरील ही कोकण स्पेशल गाडी थेट वसई-दिवा मार्गावर रवाना होईल. या साडेचार किलोमीटरच्या बायपास दुहेरी मार्गावर ओव्हरब्रीजही असतील व त्यासाठी 423 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

मागील वर्षी गणेशोत्सवात पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाणारी गाडी सुटली नव्हती. या वेळेला दोन इंजिने लावून ही गाडी सोडावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. मात्र सध्या लॉकडाऊन असल्याने राज्य सरकारने मागणी केल्यासच अशी गाडी सोडली जाईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले. त्यानुसार अशा गणपती विशेष गाडीची मागणी करावी, असे पत्रही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी मुंबईत नियमावली

मुंबई : कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपर्यंत आणि शक्‍यतो शाडूची असावी, घरीच किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावे, शक्‍यतो विसर्जन माघ महिन्यात किंवा पुढल्या वर्षी करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. घर प्रतिबंधित वस्ती किंवा सील इमारतीत असल्यास त्याबातचे नियम पाळावे. महापालिका आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायदा व आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई होईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. या कायद्यानुसार 1 वर्षापर्यंतची कैद आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. 

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख