भाजपच्या आमदारांनी दिलं मोलकरणींना ऑनलाईन प्रशिक्षण - BJP MLAs give online training to maids | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या आमदारांनी दिलं मोलकरणींना ऑनलाईन प्रशिक्षण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कामाच्या ठिकाणच्या व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता याचे प्रशिक्षण कष्टकरी महिलांना देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

मुंबई : कोरोनाच्या फैलावात घरकामे करताना स्वतःचे तसेच कामाच्या ठिकाणच्या व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी नेमके काय करावे याचे निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण कष्टकरी महिलांना देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन आज कांदिवली (पूर्व)चे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

कोरोनाचा फैलाव अजूनही आटोक्यात आला नसला तरी सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. इमारतींमध्ये कष्टकऱ्यांना जाण्याची परवानगीही मिळाली आहे. मात्र संसर्ग न होण्यासाठी स्वतःचे व इतरांचे आरोग्य सांभाळून अनेक घरांमध्ये काम करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने कांदिवलीतील सुमारे दोनशे कामकरी महिलांना प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे. एरवी हे प्रशिक्षण मोबाईलमार्फत दिले जाते, मात्र कामकरी महिलांना ते देखील व्यवहार्य नसल्याने कांदिवलीच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात या महिलांना तज्ज्ञ व्याख्यात्यांनी आपल्या कार्यालयातून ऑनलाइन प्रशिक्षण दिले. हे व्याख्यान या मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीत स्वच्छता पाळून सर्वांचे आरोग्य कसे सांभाळावे, काम त्वरेने आणि नेटकेपणाने कसे करावे, घरात कसे वावरावे, तेथे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करावे, संभाषणकौशल्य, मास्क-सॅनिटायझरचा वापर कसा करावा, सुरक्षित अंतर कसे ठेवावे, याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

स्वच्छतेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे कशी हाताळावीत याचेही प्रशिक्षण देण्यात आले, हे संपूर्ण प्रशिक्षण आठवड्याभराचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'सेवा सप्ताह' अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे.  

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या घरगुती कामकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी घरगुती कामगार कल्याण मंडळाला राज्य सरकाने तत्काळ १०० कोटी रुपयांची मदत द्यावी. राज्यात बंद असलेली घरगुती कामगारांची नोंदणी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी भातखळकर यांनी यावेळी केली. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत महिलांना केवळ चार टक्के दरावर कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटनही जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. बँक 8 टक्के दराने कर्ज देणार आहे, मात्र, त्यातील चार टक्के व्याजाचा भार भातखळकर उचलणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख