खडसेंनी आता निवडणुकीला उभेच राहावे : प्रसाद लाड यांचे नव्याने आव्हान - BJP MLA prasad lad challenges Khadse to contest election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

खडसेंनी आता निवडणुकीला उभेच राहावे : प्रसाद लाड यांचे नव्याने आव्हान

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

खडसेंना आता थेट मैदानात येण्याचे आव्हान 

मुंबई ः एकनाथ खडसे सहा वेळा निवडून आले त्यामागे भाजपचे संघटन, रा स्व संघाची ताकद व वाजपेयींसारख्या ज्येष्ठांचे आशिर्वाद होते हे त्यांनी ध्यानात ठेवावे. आता नव्या पक्षात त्यांना लौकरच त्यांची जागा कळून येईल व भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकदही दिसून येईल, असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले खडसे व भाजपचे लाड यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले असून आज लाड यांनी ट्वीट करून खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खडसे यांनी आता वेळ येईल तेव्हा पुन्हा निवडणुकीला उभे राहून दाखवावे, असे आव्हानही लाड यांनी `सरकारनामा` शी बोलताना दिले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्यावेळी आपण संपूर्ण भाजप फोडून दाखवू, असे विधान खडसे यांनी केले होते. त्यामुळे खडसे यांची एवढी कुवत असती तर त्यांनी स्वतःच्या कन्येला निवडून आणले असते, असे उत्तर लाड यांनी दिले होते. त्यावर आपण सहा वेळा लोकांमधून निवडून आलो असून लाड यांनी एकदा तरी निवडून यावे, असा टोला खडसे यांनी विधानपरिषद सदस्य लाड यांना लगावला होता.  

खडसे स्वतःला ताकदवान समजतात पण भाजपमध्ये काम करणे किती सोपे होते व आता अन्य पक्षात काम करणे किती कठीण आहे हे त्यांना कळून चुकेल. भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे व तो वाढविण्यात खडसे यांचेही योगदान होते. मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे खडसे यांनाही चांगलेच ठाऊक आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचा पक्ष आहे व आता त्या पक्षातील आपली जागा काय हे खडसे यांना कळून येईल. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंचा वापर करून घेईल. कारण फडणवीसांचे चारित्र्य स्वच्छ असल्याने बाकी कोणाचीच फडणवीसांवर टीका करण्याची हिंमत नाही. वैफल्यग्रस्त खडसे केवळ सूडापोटी फडणवीस यांच्यावर राग काढत राहणार, असेही लाड यांनी म्हटले आहे. मी नक्कीच सात वेळा निवडून येईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.  

भाजपने ओबीसी नेत्यांवर अन्याय केला, असे खडसे म्हणतात, मात्र खडसे व त्यांचा परिवार हाच भाजपचा ओबीसी चेहरा नाही. भाजपने असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांना लहानमोठी पदे दिली आहेत. मात्र मला माझ्या घरात आमदारकी, खासदारकी, जिल्हा बँक, दूध संघ हवा असे खडसे यांचे म्हणणे आहे. खडसे यांनाच पदे दिली तर ओबीसींना पदे मिळाली व इतर ओबीसी नेत्यांना पदे दिली तर भाजपने ओबीसी नेत्यांवर अन्याय केला, हे खडसे यांचे म्हणणे चुकीचे आहे. आता खडसे नसले तरीही उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद किती आहे हे भविष्यात त्यांना कळेल. वेळ आल्यावर त्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावे, असेही आव्हान लाड यांनी दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख