वर्षा गायकवाड यांचा निर्णय म्हणजे निव्वळ धूळफेक!  - BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes Varsha Gaikwad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

वर्षा गायकवाड यांचा निर्णय म्हणजे निव्वळ धूळफेक! 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

शाळांची एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठे जायचे याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करावा.

मुंबई : "फी वाढ व सक्तीची फी वसुली करणाऱ्या शाळांची एनओसी रद्द करण्याचा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा निर्णय निव्वळ धूळफेक" करणारा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes Varsha Gaikwad) 

हेही वाचा : नाशिकच्या तिघा महिलांनी सांभाळले राज्य देशाचे आरोद्य!

राज्यात कोरोनाचे संकट असतानाही भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फी करिता तगादा लावणार्‍या आणि फी अदा न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणार्‍या मुंबई व नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा गायकवाड यांचा निर्णय निव्वळ धूळफेक करणारा आहे. तो निर्णय म्हणजे पालकांची फसवणूक असल्याचेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली. शाळांच्या फीवाढी विरोधात तक्रार करण्यासाठी असलेल्या विभागीय शुल्क समित्या जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या दणक्याची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारने शाळांच्या कारवाईचा थापेबाजपणा बंद करावा, असेही ते म्हणाले. 

या शाळांची एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठे जायचे याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करावा. कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः व भाजपने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

हेही वाचा : प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत खरी कारणे!

केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम 'शिक्षणसम्राट-धार्जिणे' महाविकास आघाडी सरकार करत आहे, असेही भातखळकर म्हणाले. 

यासंदर्भात भातखळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी-पालकांना फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचेही भातखळकर यांनी यावेळी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख