नवाब मलिकांचा आरोप म्हणजे बेशरमपणा, खोटारडेपणाचा कळस  : अतुल भातखळकर - BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes Minority Minister Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

नवाब मलिकांचा आरोप म्हणजे बेशरमपणा, खोटारडेपणाचा कळस  : अतुल भातखळकर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.

मुंबई : ''महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरविले तर कंपन्यांवर कारवाई करू, अशी केंद्र सरकारने कंपन्यांना धमकी दिली हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस आहे, नवाब मलिकांनी आपल्या या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,'' अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  

''राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेडचा तुटवडा आहे, असे मलिक म्हणतात, मग यांचे मंत्री कुठे आहेत, हे बिळात लपून बसले आहेत का. टि्वटरवरुन असे खोटे व बेशरमपणाचे आरोप मलिक करीत आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत. जनतेची माफी मागा..अन्यथा राजीनामा द्या,'' असे भातखळकर यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा यावरुन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली होती.  ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्राने महाराष्ट्राला पुरविली नाही तर आम्ही औषध साठा जप्त करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी नवाब मलिक यांना सवाल केला आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे देशातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकारने त्याला नकार दिला आहे, असे मलिक यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.  
 
जनतेचा जीव वाचवण्यासाठी ही जी औषधी आहेत, त्यांना विकण्याची परवानगी द्या, जर तुम्ही परवानगी  दिली  नाही तर आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. ही सगळी औषधं जी महाराष्ट्राचा जमिनीवर आहेत, निश्चितरूपाने एफडीएच्या मंत्र्याच्या माध्यमातून तो विभाग सीझ करेल व जनतेला वाटप करण्याचं काम केलं जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे मलिक यांनी केंद्र सरकारला सांगितले आहे. 

16 निर्यात कंपन्यांकडे राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनाबाबत विचारले. केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी आम्हाला दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असल्याचे मलिक यांनी सांगितले. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख