उदय सामंतानी युवराजांना खूश करणे सोडावे 

मुख्य म्हणजे आधीच कोरोनामुळे अपुरा निधी मिळाल्याच्या कारणाने आर्थिक अडचणीत आलेल्या विद्यापीठांवर या कार्यक्रमाचा आर्थिक भार सामंत यांनी टाकणे अत्यंत गैर आहे.
Atul Bhatkhalkar Uday Samant .jpg
Atul Bhatkhalkar Uday Samant .jpg

मुंबई : मंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात विद्यापीठांच्या कंत्राटांची माहिती मागविणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी युवराजांना खूश करण्यासाठी आयोजित केलेला 'उच्चशिक्षण मंत्रालय @ वरळी' हा जनता दरबारचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुख्य म्हणजे आधीच कोरोनामुळे अपुरा निधी मिळाल्याच्या कारणाने आर्थिक अडचणीत आलेल्या विद्यापीठांवर या कार्यक्रमाचा आर्थिक भार सामंत यांनी टाकणे अत्यंत गैर आहे. त्याऐवजी त्यांनी आपली जबाबदारी ओळखून राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणांवर भर द्यावा, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.  

विद्यापीठातील समस्या समजून घेण्याचे कारण पुढे करत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 'उच्चशिक्षण मंत्रालय @ वरळी' हा अनावश्यक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठांशी संबंधित विषयाचा कार्यक्रम वरळीला घेऊन ‘युवराजांना’ खूश करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. कायद्यानुसार विद्यापीठ ही स्वायत्त संस्था असून राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत.

त्यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार सामंत यांना नाही. तरीही जर त्यांना विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर त्यांनी विद्यापीठाची रीतसर परवानगी घेऊन प्रत्येक विद्यापीठाच्या सभागृहात असे कार्यक्रम घ्यावेत, असेही भातखळकर यांनी त्यांना सुनावले आहे. 

सामंत हे मंत्री झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने सर्व विद्यापीठांना पत्र लिहून त्यांच्या कंत्राटाची माहिती मागितली होती. त्यातून या मंत्र्यांना शिक्षण व्यवस्थेत रस नसून केवळ कंत्राट व आर्थिक बाबींमध्येच जास्त रस असल्याचे दाखवून दिले होते, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे जनता दरबार कार्यक्रमाचा खर्च मुंबई विद्यापीठ व एसएनडीटी विद्यापीठांना करण्यास सांगण्यात आले आहे. असे करताना विद्यापीठ नियामक मंडळाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कंत्राट कोणाला द्यायचे हे सुद्धा अगोदरच ठरविण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असताना आणि मुंबई, नवी मुंबई व ठाणे या महानगरपालिकांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी दिली नसतानाही एवढा मोठा कार्यक्रम घेऊन उच्चशिक्षणमंत्री काय साध्य करणार आहेत, असा प्रश्नही भातखळकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण प्रणालीनुसार राज्यातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यात संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, रोजगार संवाद केंद्र अशा संस्थांची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी व पालक यांच्यावर वाढत चाललेला खर्चाचा ताण कमी व्हावा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागावा आणि जास्तीतजास्त युवकांना रोजगार कसा मिळेल यासाठी आणि राज्यातील महाविद्यालयांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्येची सोडवणूक व्हावी यासाठी विद्यापीठांना अधिक स्वावलंबी कसे बनविता येईल यासाठी उच्चशिक्षण मंत्र्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

परंतु तसे न करता केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी निर्णय घ्यायचे आणि त्यातून गोंधळ माजवण्याचेच सत्रच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चालविले आहे, ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, निकालात गोंधळ, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ आणि आता विद्यापाठींच्या अखत्यारीत असलेल्या विषयांत हस्तक्षेप करून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत गोंधळ माजविण्याचे काम उदय सामंत करीत असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com