देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत भाजप नेत्यांचा शिवसेनेला चिमटा! - bjp leades taunt shivsena while greeting Devendra Fadnavis for Bihar victory | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत भाजप नेत्यांचा शिवसेनेला चिमटा!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारच्या निकालामुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास वाढल्याचा दावा

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात या निवडणुकीत शिवसेनेला `नोटा`पेक्षा कमी मते मिळाल्याने सेनेवर आयतेच बाण मिळविण्याची संधी भाजप नेत्यांना मिळाली आहे.

या निवडणुकीतील विजयाच्या श्रेयाच्या वाट्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना पेढा भरवून अभिनंदन केले. फडणवीस यांनीही विजयाच्या निमित्ताने सेनेला चिमटे काढले.  प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांनी फडणवीस यांना पेढा भरवला. यानिमित्त शेलार यांनी कविताही रचली.

`काँग्रेसने  महाराष्ट्रात "हातात" "धनुष्यबाण" धरला,

त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला...
आता...

महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या "घड्याळाचे" 

काय सांगावे टायमिंग...?

पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच!

 त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!`

 

यानिमित्त फडणवीस हे पण पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले की बिहार निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे.संपूर्ण देश कोरोनाशी लढत होता तेव्हा नरेंद्र मोदींना सर्वसामान्य नागरीकांची चिंता व्यक्त करत होते.
 त्याचा परिणाम येथे दिसला. त्यामुळे अनेकांची हवा दिसत असूनही प्रत्यक्षात भाजप आघाडीलाच तेथे बहुमत मिळाले.
या निवडणुकीची कशा प्रकारे तयारी केली यावर बोलताना फडणवीस म्हणाले की बिहारमध्ये जातीय समाकरणे वेगळी आहेत. प्रत्येक मतदारसंघात वेगळा प्रभाव दिसून येतो. ती समीकरणे हातळण्यात यश आले. तिथे मागासवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना कोणते प्रतिनिधी द्यायचे. या साऱ्याचा समतोल साधताना कसोटी पणाला लागली. नितीशकुमार भाजपला सोडून कोठेही जाणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की शिवसेनेने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोठा गाजावाजा केला होता. बिहारमध्ये ५० जागा लढवणार! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार, अशा घोषणा केल्या. काय झालं? त्यांच्या एकाही जागेवरील डिपाॅझिट वाचलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

मी केंद्रीय राजकारणात जाणार नाही. मला पक्ष जी जबाबदारी देणार ते मी पार पाडणार. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख