ठाकरे सरकार म्हणजे 'अलीबाबा चालीस चोर'...मुनगंटीवार यांचा टोला - BJP leader Sudhir Mungantiwar criticizes Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकार म्हणजे 'अलीबाबा चालीस चोर'...मुनगंटीवार यांचा टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

सचिन वाझेच्या आरोपाची सीबीआयने संपूर्ण चौकशी करत प्रकरणातील अन्य नावे जनतेच्या दरबारात खुली करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार 'अलीबाबा चालीस चोर' च्या धर्तीवर' गृहमंत्री आणि सचिन वाझे' असे प्रकरण असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. मुनगंटीवार चंद्रपूर येथे बोलत होते. 

मुनगंटीवार म्हणाले की,  स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त सीबीआयने सरकारमधील अशी सर्व घाण खणून काढली पाहिजे. विधीमंडळात वाझे विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप लढत असताना अनिल देशमुख आणि अनिल परब या मंत्र्यांनी त्यांचा बचाव करत अकलेचे तारे तोडले होते. वाझेच्या आरोपाची सीबीआयने संपूर्ण चौकशी करत प्रकरणातील अन्य नावे जनतेच्या दरबारात खुली करावी. 

अमरावती जिल्ह्यातील पूर्वीचे लॉकडाऊन व त्यानंतर रुग्णसंख्येत झालेली घट पाहता आता ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करावेत, असे निवेदन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरही लॉकडाउन असल्याने व्यापारी व जनतेमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

कोरोनाबाधितांची त्यावेळची वाढती संख्या पाहून अमरावती जिल्ह्यात यापूर्वीच लॉकडाऊन सुरू होते. त्यानंतर बाधितांच्या संख्येत घट झाल्याने निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. आता राज्य शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. तथापि, अमरावतीत यापूर्वीचे लॉकडाऊन व रुग्णसंख्येत झालेली घट पाहता नव्या अधिसूचनेचा पुनर्विचार करणे आवश्यक वाटते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात नमूद आहे.

जिल्ह्यात २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान रुग्णसंख्या ६०० ते ८०० होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले. साथ लक्षात घेऊन व्यापारी बांधव व नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे मार्च व एप्रिलमध्ये ही संख्या रोडावत जाऊन अडीचशेपर्यंत घटली. २३ फेब्रुवारीला ३७.५ वर असलेला पॉझिटिव्हीटी रेट ५ एप्रिलला ११.३ पर्यंत घटला आहे. दरम्यान, गरज लक्षात घेऊन हळूहळू विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. तत्पूर्वी चाचणी बंधनकारक असल्याने त्यालाही व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. निकषानुसार लसीकरणही गतीने होत आहे.

मागच्या महिन्यातील लॉकडाऊनला व्यापारी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आता हळूहळू येथील स्थिती सुधारून लॉकडाऊन खुले होत असतानाच पुन्हा नवे निर्बंध आल्याने व्यापारी व नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद राहून नुकसान होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख