शिवसेना, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली..भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर... - BJP leader Ram Kadam criticizes shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली..भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

'शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत वादामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणातील आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर 'सामना'च्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. बदल्यांमागील कारणे सांगताना भाजपवरही निशाणा साधला आहे. 

भाजपचे नेते राम कदम यांनी 'सामना'च्या अग्रलेखावर टीका केली आहे, ते म्हणाले की आजच्या सामना मधून पुन्हा एकदा सचिन वाझेंची पाठराखण केलेली आहे. मुंबई आयुक्तांची बदली हे रूटीन बदली असल्याचे म्हटलं आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अंतर्गत वादामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे.

"मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. टीआरपी घोटाळय़ाची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल," असे 'सामना'च्या अग्रलेखात नमूद केलं आहे. 

दहशतवादासंदर्भातील प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करीत असते; पण या जिलेटिनच्या कांडय़ांचा तपास करणाऱया ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांडय़ा हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे. या सर्व प्रकरणातील घडामोडींचे श्रेय राज्यातील विरोधी पक्ष घेत आहे. अटकेत असलेले फौजदार वाझे यांच्यामागचे खरे सूत्रधार कोण? वगैरे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला व त्याबद्दल सगळय़ांनाच दुःख आहे. भारतीय जनता पक्षाला जरा जास्तच दुःख झाले आहे, पण याच पक्षाचे एक खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संसदेचे अधिवेशन सुरू असताना दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. शर्मा हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल भाजपवाले छाती बडवताना दिसत नाहीत. मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत तर कोणी ‘ब्र’ काढायला तयार नाही. सुशांतसिंह राजपूत व त्याच्या कुटुंबीयांना तर सगळेच विसरून गेले आहेत. एखाद्याच्या मृत्यूचे भांडवल कसे करायचे हे सध्याच्या विरोधी पक्षाकडूनच शिकायला हवे. मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न या काळात सुरू आहेत. विरोधी पक्षाने निदान एवढे पाप तरी करू नये. विरोधी पक्षाने महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे स्वप्न बाळगले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण हे असे उपद्व्याप केल्याने त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्च्या मिळतील हा भ्रम आहे, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख