बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भुजबळांचे शिवसेनेकडून समर्थन - BJP leader Ram kadam criticise shivsena over chhagan bhujbal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भुजबळांचे शिवसेनेकडून समर्थन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

आज शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर भाजपसह देशभरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पण महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण यावरून तापले आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ममतांचे कौतुक करत पंतप्रधान मोदींवरही (PM Modi) टीका केली होती. त्यावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही त्यांच्यावर पलटवार केला. आता शिवसेनेनेही या वादात उडी घेतली आहे. 

आज शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावरून भाजपचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. ''सामनामधून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थन करण्यात आले आहे. हे तेच मंत्री आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप असून जामीनावर बाहेर आहेत. त्यांनी यापूर्वी शिवसेनेमध्ये फार मोठी फुट पाडत, गद्दारी करत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यांना टी बाळू सारख्या अपमानजनक भाषेत बोलण्याचे धाडस केलं होतं. बाळासाहेबांना ते अटक करायला निघाले होते, असे कदम म्हणाले.

हेही वाचा : जगातील सर्वात महागडा घटस्फोट? बिल अन् मेलिंडा गेट्स 27 वर्षांनंतर होणार वेगळे

सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना राष्ट्रवादीच्या त्याच मंत्र्यांचे समर्थन करत आहे. दुसरीकडे जय श्रीराम बोलल्यानंतर ज्या ममता बॅनर्जींना राग येतो, त्यांचे समर्थन करायलाही शिवसेना पुढे आली. आज दिल्लीच्या संसदेतील शिवसेनेचे खासदार केवळ मोदीजींच्या करिष्म्यामुळे आहेत, हे विसरण्याचे पार शिवसेनेने करून नये. सत्तेसाठी बदललेली, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिलेली शिवसेना उभा महाराष्ट्र पाहत आहे, अशी टीका कदम यांनी केली आहे. 

भुजबळ-पाटलांची एकमेकांवर टीका

भाजपचा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालात धुव्वा उडाल्यानंतर देशात घरोघरी मोदीच्या विरोधात वातावरण आहे, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना  छगन भुजबळांनी  पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे ते म्हणाले.

यानंतर भुजबळ यांनीही त्यास उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची शक्ती देखील ठेवायला हवी. दुर्दैवाने त्यांना वारंवार पराभवाचे चटके बसणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलायला हवं. आपला पुतण्या समीर भुजबळ याला दीड महिने आधी तुरूंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर माझ्यावर कारवाई झाली. मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी गेला असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी हा कोणता पुतण्या काढला हे मला माहीत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

सामनामधून भाजपवर टीकास्त्र

छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यात काय चुकलं, असे म्हणत सामनातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान मोदीही नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा राजशिष्टाचार आहे. पण भुजबळांनी ममतांचे अभिनंतर केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राग आला. त्यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले असल्याची आठवण करून देत इशारा दिला. भुजबळांनी गप्प बसावे, नाहीतर त्यांना पुन्हा तुरूंगात टाकण्याची क्षमता आपल्यात आहे, असे पाटील यांना सुचवायचे आहे का? हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रकार आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख