प्रसाद लाड यांनी परबांना ठणकावले..पोलिसांच्या आड लपून हल्ला करु नका.. - bjp leader prasad lad warns anil parab   | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसाद लाड यांनी परबांना ठणकावले..पोलिसांच्या आड लपून हल्ला करु नका..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

परब आणि शिवसेना कार्यकर्ते हे पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर  हल्ला करत आहेत

मुंबई : " भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करू नये. त्यांनी पोलिसांचा पदर सोडून समोरासमोर यावे, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,"  अशा शब्दात महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी परब यांना ठणकावले आहे. bjp leader prasad lad warns anil parab  

तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद  झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकी अजूनही सुरु आहेत. विशेष म्हणजे एक दोन अपवाद वगळता भाजप नेत्यांनीही शिवसेना नेत्यांच्या प्रक्षोभक भाषेला तशाच शब्दांत उत्तर देऊन "हम भी कुछ कम नही" हे दाखवून दिले आहे. 

 सेना भवन येथे भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अनिल परब यांनी काल चिथावणीची भाषा केल्याचा दावा लाड यांनी केला आहे. शुक्रवारी परब यांनी भाजप कार्यकर्त्यांना इशारा देणारी भाषा वापरत ‘आम्ही भाजप कार्यकर्त्यांना ठीक करू,’ असा दम दिल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. त्यावर लाड यांनी प्रत्युत्तर देताना "इट का जबाब पत्थरसे" , असे सुनावले. 

“मी परब यांना सांगू इच्छितो की त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये. मुख्य म्हणजे परब आणि शिवसेना कार्यकर्ते हे पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर  हल्ला करत आहेत. यात कसलाही पुरुषार्थ नाही. परब यांनी हिंमत असेल तर पोलिसांचा पदर सोडून समोर यावे आणि संघर्ष करावा. त्यांना मग आम्ही जशाच तसे उत्तर देवू,” अशा शब्दांत लाड यांनी त्यांना आव्हान दिले आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने बुधवारी फटकार मोर्चा आयोजित केला होता. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अनिल परब  काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला होता. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असं ते म्हणाले.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख