बाळासाहेबांनंतर शिवसेना बिघडली ; आता शाखांमध्ये ‘तोडपाणी’ चालते!  - BJP leader Prasad Lad criticizes ShivSena | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेबांनंतर शिवसेना बिघडली ; आता शाखांमध्ये ‘तोडपाणी’ चालते! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

शिवसेनेने कोरोना काळातदेखील प्रचंड भ्रष्टाचार केला.  

मुंबई : एकेकाळी सर्वसामान्यांना मदत करणारी शिवसेना Shiv Sena आता उरली नाही. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना आता रस्त्यावर दिसत नाही. पूर्वी शाखाप्रमुख हा नेहमी शाखेत दिसायचा, लोकांना मदत करायचा. आता मात्र ‘त्या’ शाखांमध्ये लोकांना मदत नाही, तर ‘तोडपाणी’ चालते, असा घणाघात भाजपचे BJP महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड  Prasad Lad यांनी केला. BJP leader Prasad Lad criticizes Shiv Sena

मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. यादरम्यान त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला. आजही मुंबईत आरोग्य, पाणी, रस्त्यांवरील खड्डे, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांचे प्रश्न सुटलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी १४ हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला ; मात्र हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे हरित लवादाकडून मुंबई महापालिकेला दररोज चार लाख रुपयांचा दंड भरावा लागत आहे. सध्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या कामाच्या निधीत ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर कॅगनेही ताशेरे ओढले. यातून मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारला गेल्याचे लाड म्हणाले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना केली. सर्वसामान्यांनी हाक देताच शिवसेना धावून येत होती; मात्र बाळासाहेबांनंतर शिवसेना बिघडली आहे.  बाळासाहेब असताना पालिकेसह स्थायी समितीतील प्रत्येक प्रश्न आणि निर्णय जनहिताचा होता. आता मात्र पालिकेच्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार बोकाळला आहे, अशी टीका लाड यांनी केली. 
 
शिवसेनेने कोरोना काळातदेखील प्रचंड भ्रष्टाचार केला. या काळात २२०० कोटींच्या वस्तूंची खरेदी कोणत्याही निविदेशिवाय करण्यात आली. पाच लाख रुपयांवरील कामासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असते ; मात्र त्याला बगल देण्यात आली. याशिवाय मिठी नदीतील गाळ काढण्याची कामेही निविदा न काढता करण्यात आले. याबाबत आपण पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार नोंदवली असून प्रसंगी लोकायुक्त तसेच न्यायालयात जाणार असल्याचे लाड म्हणाले.

पालिका निवडणूक स्वबळावर
भाजप आता पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूकदेखील भाजप स्वबळावर लढेल. मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे आमचे स्वप्न आहे. पालिकेवर कमळ फुलवण्याचा आम्ही सर्वांनी विडा उचलला आहे. पालिकेमध्ये भाजपची सत्ता येईलच, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख