सरनाईकांच्या पत्रावर भाजपचा शिवसेनेला 'हा' सल्ला - BJP advice to ShivSena on Saranaik letter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

सरनाईकांच्या पत्रावर भाजपचा शिवसेनेला 'हा' सल्ला

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 जून 2021

भाजपशी मैत्री करण्याबाबत विचार करावा, असेही आवाहन सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याबाबत ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात भाजपचे (BJP) राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सावध भूमिका घेतली आहे. भाजपची या मुद्द्यावर कोणतीही विशिष्ट भूमिका नाही. तसेच भाजपमध्ये यावर चर्चाही झाली नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून या प्रश्नी पक्षांतर्गत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे लाड म्हणाले आहेत. (BJP advice to ShivSena on Saranaik letter)

शिवसेना (ShivSena) आमदारांच्या कथित गैरव्यवहार बाबात केंद्रीय यंत्रणांमार्फत त्यांना त्रास दिला जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शिवसेनेला कमकुवत करीत आहेत, असेही सरनाईक यांनी या पत्रात सूचित केले आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी मैत्री करण्याबाबत विचार करावा, असेही आवाहन सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याबाबत लाड यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली.

हे ही वाचा : सारथी संस्थेला स्वायत्तता; मराठा समाजासाठी विविध सवलती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट तसेच आता सरनाईक यांचे पत्र म्हणजे सेना-भाजपच्या जुन्या मैत्रीची नवी सुरुवात होईल का, या प्रश्नावर लाड म्हणाले की नरेंद्र मोदी-ठाकरे यांची भेट ही पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची भेट होती. आम्ही त्याला कोठेही राजकीय दृष्टीने पाहत नाही. यापूर्वीची भाजप सेना युती ही नैसर्गिक हिंदुत्वाच्या भूमिकेतून केलेली विचारांची युती होती. आता महाविकास आघाडीचे सरकार बनवताना भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनेने केले. 

या तीन पक्षांची अनैसर्गिक, असमर्थनीय युती करण्यात आली. शिवसेनेच्या सत्तेतील पदाधिकाऱ्यांना फक्त या युतीचा फायदा होत आहे. आपली कामे होत नसल्याने सामान्य शिवसेना कार्यकर्ता दुःखी आहे. तसेच हिंदुत्वाच्या विचारांमध्ये आपण मागे पडत आहोत असे शिवसेना कार्यकर्त्यांना वाटते आहे. म्हणून ते पुन्हा भाजपशी युती करण्याबाबत चर्चा करीत आहेत, असेही लाड यांनी सांगून भाजप याप्रश्नी तटस्थ असल्याचे सूचित केले.

हे ही वाचा : अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करु: आमदार जगतापांचे खुले आव्हान

खासदार संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचे काम संजय राऊत वेळोवेळी करत आहेत. तोच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही लाड म्हणाले.  
 
Edited By - Amol Jaybhaye  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख