भिवंडी : भिवंडी शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब खान यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यामुळे भिवंडीत नाराजीचे सुर उमटत असुन गटबाजी उफाळून आली आहे.भिवंडी पालिकेच्या नगरसेवकां सह पदाधिकारी यांनी रशीद ताहीर मोमीन यांच्या अध्यक्ष नियुक्तीला विरोध करीत राजीनामा देण्याचे पत्र प्रदेश काँग्रेस कार्यालयास पाठवून बंड पुकारल्याचे संकेत दिले आहेत.
भिवंडी शहरात काँग्रेस मजबूत करण्यात शोएब गुड्डू खान यांचा मोलाचा वाटा असून त्यांना पदावरून दूर करणे चुकीचे आहे.असे मत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक फराज बाहुउदीन, हालीम अन्सारी,अरूण राऊत यांच्या सह अन्य 14 नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
नवीन अध्यक्ष नेमताना पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र प्रदेश काँग्रेस नेत्यांनी परस्पर नियुक्ती केली आहे.ही नेमणूक ही चुकीची असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी यांनी केला आहे.
रशीद ताहीर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास सर्व नगरसेवक काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती नगरसेवकांच्या बैठकीत फराज बहाउद्दीन यांनी केली.यावेळी काँग्रेस गटनेता हलीम अन्सारी,नगरसेवक अरुण राऊत, वसीम अन्सारी सह 14 उपस्थित होते.

