बंगळूर पोलिसांचा विवेक ओबेरॉयच्या घरावर छापा 

कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा असलेल्या आदित्य अल्वा विरोधात बंगळूरच्या कोटोनपेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Bangalore police raid Vivek Oberoi's house
Bangalore police raid Vivek Oberoi's house

मुंबई : बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी बंगळूर पोलिसांनी छापा टाकला. बंगळूर येथील अमली पदार्थ प्रकरणात विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा संशयित आरोपी आहे. 

कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा असलेल्या आदित्य अल्वा विरोधात बंगळूरच्या कोटोनपेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचीही नावे पुढे आली होती. 

आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असावा, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरात शोध मोहीम राबवली, असे पोलिसांनी म्हटले आहे. या छाप्यात काही सापडले नाही. आदित्य अल्वासह मुख्य आरोपी शिवप्रकाश आणि शेख फाझील याचा पोलिस शोध घेत आहे. 

कन्नड सिनेसृष्टीतील अमली पदार्थाचे रॅकेट समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत होणारे अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण याविषयीच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रॅन्चने (सीसीबी) एका व्यक्तीला चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना अमली पदार्थ पुरवल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक झाली आहे. 


हेही वाचा : सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाकडून वसईतून दोघांना अटक 


दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी रुपये आहे. दिवसभरात "एनसीबी'ने चार कारवाया करून अमली पदार्थ वितरणात आरोपींना अटक केली. 

मुस्ताक अहमद (50) व एस. के. सौरभ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून अहमदला सौरभ अमली पदार्थ द्यायचा. त्याच्या चौकशीत आरोपी मुंबईतील ड्रग वितरकांना अमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती निष्पन्न झाली.

सौरभच्या चौकशीत हे अमली पदार्थ राकेश खानिवडेकर व त्याचा भाई ए. खानिवडेकर यांचे असल्याचे समोर आले. या प्रकरणी ए. खानिवडेकरला ताब्यात घेण्यात आले. त्याचा भाऊ राकेश याला यापूर्वी गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) 483 किलो एफिड्रीनप्रकरणी अटक केली होती. सध्या तो जामिनावर असल्याचे त्याने एनसीबीला सांगितले. 

आणखी एका कारवाईत एनसीबीने प्रदीप राजाराम साहनी याला 70 ग्रॅम एमडीसह अंधेरीतून अटक केली. तो बालाजी टेलिफिल्म प्रा. लि. येथे कंत्राटदारामार्फत शिपाई म्हणून कामाला होता. तो अंधेरी व जुहूतील नागरिकांना अमली पदार्थ पुरवत होता. 

जम्मू-काश्‍मीरमध्येही कारवाई 

दिल्ली एनसीबीने जम्मू-काश्‍मीरमध्ये केलेल्या कारवाईत 56 किलो चरस जप्त केले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्यानंतर चौकशीत हे अमली पदार्थ मुंबईला पाठवण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com