मोदींनी बदली केलेले अल्पन बंदोपाध्याय ममतांच्या टीममध्ये..सल्लागारपदी नियुक्ती..

ममतांनी यातून केंद्राच्या दबावाला झुकणार नसल्याचा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मोदींनी बदली केलेले अल्पन बंदोपाध्याय ममतांच्या टीममध्ये..सल्लागारपदी नियुक्ती..
Sarkarnama Banner - 2021-06-01T120233.286.jpg

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय हे काल ( ता. ३१ मे ) सेवेतून निवृत्त झाले आहेत. बंडोपाध्याय यांनी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमधील साठमारीत अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते राजीनाम्यानंतर ममतांच्या टीममध्ये सहभागी झाले आहेत. bandopadhyay resigns as west bengal chief secretary joins mamatas team

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना ३ वर्षांसाठी त्यांना आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ममतांनी यातून केंद्राच्या दबावाला झुकणार नसल्याचा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बंडोपाध्याय यांच्याविरोधात केंद्राच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊ शकते.  एच. के. द्विवेदी यांची पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ममता बॅनर्जींनी स्वतः ही माहिती दिली. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय साठमारीवरून केंद्र सरकावर हल्लाबोल केला आहे. हे सूडाचे राजकारण आहे. एवढी क्रूर वागणूक आपण कधीच बघितली नाही. राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय केंद्र सरकार कुठल्याही अधिकाऱ्याला केंद्रात प्रतिनियुक्ती करू शकत नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. अलपन बंडोपाध्याय हे आज निवृत्त होत असले तरी ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून ३ वर्ष सेवा देत राहतील, असे बॅनर्जींनी सांगितले.

मोदी सरकारने त्यांची बदली करत कालच दिल्लीतील केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) येथे सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदोपाध्याय यांना पदमुक्त केलं नाही. त्यामुळे ते बंगालच्या मुख्य सचिव पदावरूनच निवृत्त झाले.  

पश्चिम बंगालला यास चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात बंगालचा दौरा केला. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ममतांसह मुख्य सचिव अर्धा तास उशिराने दाखल झाले. यावरून मोठे राजकारण सुरू झाले. पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला. तर ममतांसह तृणमूलच्या नेत्यांनीही त्यावर पलटवार केला. 

या घटनाक्रमानंतर केंद्र सरकारने बंदोपाध्याय यांच्या केंद्रात प्रतिनियुक्तीचा आदेश काढला. राज्य सरकारला पत्र पाठवत त्यांना मुख्य सचिव पदावरून मुक्त करण्यास सांगितले. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये त्यांना सोमवारी सकाळी हजर राहण्यास सांगितले होते. वास्तविक ते आजच निवृत्ती होणार होते. त्यानंतरही केंद्र सरकारने त्यांची बदली केल्याने ममतांनी जोरदार टीकाही केली. तसेच पंतप्रधानांना हा आदेश मागे घेण्याची विनंती करणारे पत्रही पाठवले. पण त्यावर अखेरपर्यंत निर्णय झालाच नाही.

बंदोपाध्याय काल दिल्लीत जाऊन नवीन पदभार स्वीकारणार का, याबाबत उत्सुकता होती. पण ममतांनी त्यांना पदमुक्त न केल्याने ते बंगालच्या विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले. कोरोना व चक्रीवादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. दिवसभराचे कामकाज केल्यानंतर बंदोपाध्याय काल निवृत्त झाले. 

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, अल्पन बंदोपाध्याय यांच्या बदलीचा आदेश बेकायदेशीर आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीत त्यांची बदली करू नये. हा आदेश मागे घ्यावा. अशा आदेशांमुळे अधिकाऱ्यांच्या नैतिक मुल्यांवर आघात केला जात आहे, अशी टीका ममतांनी केली होती. 
Edited by : Mangesh Mahale
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in