त्या घोषणेवर बाळासाहेब थोरात नाराज... म्हणाले, आम्हाला हे आवडलेले नाही...

यावेळी थोरात म्हणाले, मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे.
 Balasaheb Thorat .jpg
Balasaheb Thorat .jpg

मुंबई : राज्यामध्ये मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्याआधीच त्याचे श्रेय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले, मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना कोरोना लस मोफत द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसी मागणी केली असून ती मान्य होईल, अशी आशा आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.  

मोफत लस देण्याबाबत मुख्यमंत्री विचार करत असतानाच, श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचे आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर नाराजी आहे, असे थोरात यांनी सांगितले. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे. ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असा टोला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.  

45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करतांना ऑनलाईन नोंदणी केली जात होती. तरीही लसीकरणासाठी मोठी गर्दी होत होती. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 18 वर्षावरील हा वर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी वाढल्याने गोंधळ होऊ शकतो. या गोंधळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे सरकारने नियोजन केले पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

18 वर्षांवरील व्यक्तिंना लस देण्यात येणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्याबाबत मी मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. त्यांना धोरण ठरवण्यास सांगितले असल्याचे थोरात यांनी सांगितले. त्यानुसार येत्या दोन दिवसात धोरण ठरवले जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्वांना मोफत लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नवाब मलिक यांनी केली होती घोषणा 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जाहीर केले आहे, असेही मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले होते. 

आदित्य ठाकरे यांचेही ट्विट 

मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असे ते म्हणले होते. आमचे कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी आदित्य  ठाकेर यांच्यावर टीका केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com