मोफत लसीकरणाच्या श्रेयावरुन ठाकरे सरकारच्या घटकपक्षात किळसवाणे राजकारण! 

राज्यातील अठरा वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठीचा आराखडा राज्य सरकारने आणखी श्रेयवादाचा गोंधळ न घालता सादर करावा.
 vaccination .jpg
vaccination .jpg

मुंबई : राज्यातील अठरा वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठीचा आराखडा राज्य सरकारने आणखी श्रेयवादाचा गोंधळ न घालता सादर करावा. त्याची कार्यवाही त्वरेने करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस निःशुल्क देण्याचे सरकारने जाहीर केले, असले तरी त्याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. राज्य सरकारचे मंत्रीच यासंदर्भात उलटसुलट विधाने करीत असल्याने गोंधळात गोंधळ हेच या सरकारचे वैशिष्ट्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. या संदर्भात भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडियो शेअर केला आहे.

राज्य सरकारमधील घटकपक्षाच्या नेत्यांनी 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावरून जो गोंधळ घातला आहे, तो अत्यंत किळसवाणा आहे. या नेत्यांकडून या निर्णयाचे श्रेय घेण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्यामुळे कोणाचीही मान शरमेने खाली जाईल, अशी खोटक टीका भातखळकर यांनी केली आहे. 

अठरा वर्षांवरील सर्वांना मोफत लस द्या ही मागणी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाने केली होती. आता आणखी गोंधळ न घालता सरकारने हा निर्णय त्वरेने जाहीर करावा. कारण एकीकडे अठरा वर्षांवरील सर्वांना लस मिळेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार करतात, सरकारने असा निर्णय घेतल्याची माहिती अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक देतात आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील याबाबत प्रथम ट्वीट करून नंतर ते डिलीट करतात. यावरून गोंधळात गोंधळ हेच राज्य सरकारचे वैशिष्ट्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

त्यामुळे सर्वांच्या मोफत लसीकरणाचा प्लान सरकारने जाहीर करावा व एक मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या निःशुल्क लसीकरणाला सुरुवात करावी, असे आवाहन भातखळकर यांनी केले आहे. 

नवाब मलिक काय म्हणले होते? 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जाहीर केले आहे, असेही मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले होते.   

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नाराजी

राज्यामध्ये मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्याआधीच त्याचे श्रेय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे,  थोरात यांनी म्हटले होते. मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना कोरोना लस मोफत द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसी मागणी केली असून ती मान्य होईल, अशी आशा आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त होता.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com