मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत! - atul bhatkhalkar targets cm uddhav thackeray on corona | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

अतुल भातखळकर यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे

मुंबई : देशभरात डेल्टा प्लसचे Delta Plus Variantच्या  रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही त्याचे प्रमाण वाढले आहे. "डेल्टा''ला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्याचा प्रयत्न करीत आहे. या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सतर्कतेचा उपाय म्हणून पुन्हा एकदा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. atul bhatkhalkar targets cm uddhav thackeray on corona

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टि्वट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, डेल्टा विषाणूपासून बचाव की, पळ? मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे.  

मध्य प्रदेशनंतर कोरोना (Corona) विषाणूच्या नवीन डेल्टा प्लस प्रकाराने महाराष्ट्रातही पहिला बळी घेतला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय महिला डेल्टा प्लस व्हेरिएंटला बळी पडली. उपचारादरम्यान रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभागासह राज्य सरकार सतर्क झाले असून आता संपर्क ट्रेसिंग, चाचणी सुरू झाली आहे.  

एप्रिलमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ७५०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २१ लोकांमध्ये डेल्टा प्लस प्रकारच्या विषाणूचा संसर्ग आढळला. शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झालेल्या एका ८० वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरीमध्ये मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकारातील सर्वाधिक सात घटना रत्नागिरीमध्ये आढळून आल्या आहेत. ज्या जिल्ह्यांत डेल्टा प्लसची प्रकरणे आढळली आहेत, त्यांच्या प्रवास-इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे आणि त्यांची चाचपणी केली जात आहे. त्यांचे जवळचे संपर्क त्या रुग्णांकडून घेतले जातील आणि त्यांनी लस घेतली आहे की नाही, ही माहिती घेतली जाईल.

 
डेल्टा प्लस प्रकार किती धोकादायक असू शकतो, तो किती वेगाने पसरतो, हा प्रकार प्राणघातक आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास वेळ लागेल. जितके अधिक जीनोम सिक्वेंसिंग केले जातील तेवढे लवकर कळेल की, व्हायरसची व्याप्ती लोकांमध्ये किती प्रमाणात पसरत आहे. आता विषाणूच्या रूपांबाबत संशोधन केल्यास वरील प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
- डॉ. ओम श्रीवास्तव, सदस्य, कोव्हिड टास्क फोर्स

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख