आठवले म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ती भूमिका चुकीची  - Athavale says Chief Minister Uddhav Thackeray's that role is wrong | Politics Marathi News - Sarkarnama

आठवले म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ती भूमिका चुकीची 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते.

मुंबई : "विरोधी पक्षांना हात धुवून मागे लागेल, अशी जाहीर धमकी देणे, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संविधानिकदृष्ट्या चूक आणि लोकशाहीला मारक भूमिका आहे,' असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

महाविकास आघाडी सरकारने वर्षभर केलेल्या कामाच्या आधारावर राज्य सरकारला किती गुण द्यावेत, याचा जनतेला प्रश्न केला, तर जनता महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार करेल, अशी संभावना करीत 100 पैकी केवळ 30 गुण जनता देईल, असा टोलाही आठवले यांनी राज्य सरकारला लगावला. 

कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई; विजबिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आणि कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात राज्य सरकारची दिसलेली सुडबुद्धी, हे राज्य सरकारला शोभणारे नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून विरोधकांच्या मागे लागणार, अशी धमकी देणे, हे संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही. लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो. प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते. विरोधकांच्या मागे हात धुवून लागणार, ही धमकी संविधानिकदृष्ट्या चूक; लोकशाहीला मारक भूमिका आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख