मुंबई : कोरोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला असला, तरी सुरु असलेल्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषेदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मुलभूत सुविधा पुरविण्याइतपतही आर्थिक स्थिती नसलेल्या कोकणातील नगरपालिकांना विशेष व आवश्यक तेवढा निधी दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे कामाचा प्राधान्यक्रम बदलला असला, तरी सुरु असलेली कामे थांबवली जाणार नाहीत. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. मात्र, नवीन कामांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे, असे शिंदे यांनी प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गेल्या चार वर्षात नागपूर महापालिकेला मुलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत न मिळालेल्या निधीबाबतचा हा प्रश्न होता. त्यावर टोलेबाजी करताना मी २०१९ ला नगरविकासमंत्री झालो. त्याअगोदर हे खाते कोणाकडे होते हे माहित असेलच, असे म्हणत शिंदे यांनी त्याचे खापर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले.
जयंत पाटलांनी धूर्तपणे केलेले करेक्ट कार्यक्रम
चार वर्षे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ३१६ कोटी रुपयांऐवजी फक्त एक कोटी रुपये नागपूर पालिकेला मिळाल्याचे दटके यांनी सांगितले. त्यावर नागपूर महापालिकेत कुठलीही विकासकामे थांबविण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांचे कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
फडणवीस, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ यांच्यावर पुणे पोलिस गु्न्हा दाखल करणार?
तर,असा निधी थांबवला असल्याचे जबाबदारीने बोलतोय असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या चर्चेत भाग घेताना म्हणाले. कोकणातील ८० टक्के नगरपालिकांकडे, तर मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना विशेष निधी देण्याची मागणी त्यांनी केली. ती मंत्र्यांनी लगेच मान्य केली. कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे, त्यांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
Edited By - Amol Jaybhaye

