महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये सारं आलबेल आहे ना? बाळासाहेब थोरातांनी घेतली गेहलोतांची भेट!

गेहलोतांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला बाळासाहेबांना नक्कीच उपयोगी पडू शकेल...
balasaheb thorat-Ashok gehlot
balasaheb thorat-Ashok gehlot

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची आज दुपारी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र या भेटीत नक्कीच काही मौल्यवान सल्ले गेहलोत यांनी थोरातांना दिले नाहीत ना, याचीही चर्चा त्यामुळे झाली. महाराष्ट्रातील काॅंग्रेसमध्ये वातावरण ठीक आहे ना, असा सल्ला या भेटीवर नेटकऱ्यांनी विचारला. 

थोरात यांनी आज आपल्या संगमनेर या आपल्या गावी गणेश विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.  युवक काँग्रेस, एनएसयुआय व जयहिंद युवा मंच संगमनेरच्या वतीने गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता `कृत्रीम तलाव आपल्या दारी` हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज रंगार गल्ली येथे या कृत्रीम तलावाचे लोकार्पण केले. यावेळी आमदार डाॅ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या.

तो कार्यक्रम उरकून बाळासाहेब विमानाने जयपूरला गेले. अशोक गेहलोत सरकार नुकतेच मोठ्या राजकीय संकटातून वाचले. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेले बंड त्यांनी हाणून पाडले. भाजपच्या साह्याने तेथील काॅंग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुरब्बी गेहलोतांनी तो यशस्वी होऊ दिला नाही. तेथील राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरली, न्यायालयात याचिका केली, पायलटांची हकालपट्टी केली अशा नाना तऱ्हेने त्यांनी पायलटांना जेरीस आणले. नंतर पायलटच पुन्हा पक्षात येऊन गेहलोटांचे नेतृत्त्व मान्य करून गप्प बसले.

महाराष्ट्रातील काॅंग्रेस आमदारांमध्ये नेहमीच अशी चुळबुळ असल्याची चर्चा असते. राज्यातील भाजप नेतेही ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडी सरकार अंतर्विरोधाने पडेल असे सांगत असतात. त्यावेळी त्यांचा डोळा राज्यातील नाराज काॅंग्रेस आमदारांवर असतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चुकून काॅंग्रेसला अशा संकटाला तोंड द्यायची वेळ आली तर काय करावे लागेल, याचे तर काही सल्ले बाळासाहेबांनी गेहलोट यांच्याकडून घेतले नाहीत ना, याची शंका आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा खेळ सुरू झाल्यानंतर काॅंग्रेसने आपले सर्व आमदार जयपूर येथे हलविले होते. गेहलोत यांनीच या आमदारांची सर्व व्यवस्था केली होती. त्यामुळे या जुन्या आठवणीही दोघांमध्ये रंगल्या असतील, अशीही शंका आहे. भाजपचे संकट परतवून लावल्याने गेहलोट यांचा पक्षातील दबदबा आणखी वाढला आहे. त्यांच्या चार युक्तीच्या गोष्टी ऐकून बाळासाहेब सायंकाळीच परतले. त्यामुळे महाराष्ट्रात काॅंग्रेससमोर काही संकट उभे राहिलेच तर थोरातांना गेहलाोटांनी सांगितलेला सल्ला नक्कीच आठवेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com